पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षांपूर्वी सत्तेवर येताना लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आयेंगे’चे स्वप्न दाखवून सामान्य जनतेला भुरळ पाडली आणि सत्तेवर येताच आश्वासनांचा विसर पडून ‘बुरे दिन’ दाखवले, अशी टीका करीत सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाची पहिली ‘पुण्यतिथी’ पाळत प्रतीकात्मक स्वरूपात वर्षश्राद्ध घातले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली.
सकाळी काँग्रेस भवनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर जवळच असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार व जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात आला. महापौर प्रा. सुशीला आबुटे, माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार दिलीप माने, सुधीर खरटमल, माजी महापौर अलका राठोड, नगरसेवक चेतन नरोटे, माजी शहराध्यक्ष धर्मा भोसले, सोलापूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल शिंदे आदींचा आंदोलनात प्रामुख्याने सहभाग होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने केली. या वेळी प्रतीकात्मक स्वरूपात मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांचे ‘वर्षश्राद्ध’ घालण्यात आले.