जिल्हा परिषदेचे सन २०१५-१६ या वर्षांचे ३७ कोटी ७६ लाख ६० हजार ८०० रुपयांचे अंदाजपत्रक गुरुवारी मंजूर करण्यात आले. या अर्थसंकल्पात लघुपाटबंधारे, कृषी व पशुसंवर्धन विभागांच्या तरतुदीत मोठी वाढ करण्यात आली आहे. लघुपाटबंधारेमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी खास १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. काही नव्या योजनांचाही समावेश करण्यात आला आहे. पाणीपुरवठय़ाच्या देखभाल व दुरुस्तीचे यंदा वाढीव तरतुदींचा २१ कोटी ७० लाख रुपये खर्चाचा स्वतंत्र अर्थसंकल्पही प्रथमच सादर करण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागाकडील तरतुदीत काहीशी घट करण्यात आली आहे.
जि.प. अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अर्थ व बांधकाम समितीचे सभापती बाबासाहेब दिघे यांनी सन २०१५-१६चे मूळ व सन २०१४-१५चे सुधारित अंदाजपत्रक सादर केले. सन २०१४-१५ची मूळ तरतूद ३२ कोटी ७२ लाख रुपयांची होती, प्रत्यक्षात मात्र या वर्षांत ३४ कोटी ८८ लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र सुधारित अंदाजपत्रक ४ लाख रुपये शिलकीचे आहे. या वर्षांत सरकारकडील सुमारे २० कोटी रुपये विविध उपकराचे थकीत मिळतील असे गृहीत धरले होते, प्रत्यक्षात १२ कोटी ८२ लाख रु. उपलब्ध झाले आहेत.
आगामी सन २०१५-१६ साठी सरकारकडील आणखी सुमारे २ कोटी रुपये येणे अपेक्षित धरण्यात आले आहे. पंचायत समित्यांसह जि.प.चे असे एकूण ५१ कोटी ९१ लाख रु.चे अंदाजपत्रक आहे. विभागानुसार अंदाजपत्रकातील आगामी योजनांच्या तरतुदी अशा : अ-प्रशासन १ कोटी ६५ लाख, सामान्य प्रशासन ७१ लाख ६५ हजार, लघुपाटबंधारे २ कोटी ३२ लाख, सार्वजनिक आरोग्य स्थापत्य ४ कोटी, शिक्षण १ कोटी ५२ लाख, आरोग्य ५१ लाख, बांधकाम एकूण १२ कोटी ३८ लाख ९० हजार (उत्तरसाठी ५ कोटी २२ लाख व दक्षिणसाठी ७ कोटी १६ लाख), कृषी २ कोटी ७६ लाख, पशुसंवर्धन २ कोटी १ लाख, समाजकल्याण ५ कोटी १० लाख, अपंग कल्याण ८१ लाख, महिला व बालकल्याण २ कोटी २३ लाख, संकीर्ण १ कोटी ७२ लाख.
सदस्यांच्या मागणीनुसार महिला व बालकल्याणसाठी सुमारे ५० लाख रुपये वाढवून देण्याचे आश्वासन दिघे यांनी दिले. राज्य सरकारने ग्रामीण पाणीपुरवठय़ाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यासाठी एकूण २१ कोटी ७० लाख रुपयांच्या योजना सादर करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, सभापती शरद नवले, नंदा वारे, मीरा चकोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप आदी उपस्थित होते.
 काही नव्या योजना
पशुसंवर्धनमार्फत दुग्ध उत्पादनासाठी खास तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात काही नव्या योजनांचाही समावेश आहे, त्यापैकी काही अशा-एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (५ लाख), अपंग महिला व बालकांना साहित्य पुरवणे (१५ लाख), समाजकल्याणकडील कडबाकुट्टी (५० लाख), विद्यार्थी वसतिगृहांसाठी सोलर वॉटर हीटर (२० लाख), ब्युटी पार्लर प्रशिक्षण (१० लाख), शिक्षणकडील बाल आनंद मेळावे (१५ लाख), स्काऊट व गाईड (५ लाख). समाजकल्याण व महिला बालकल्याणचा सर्व अनुशेष भरून काढण्यात आला आहे.