हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भातील प्रश्न ऐरणीवर कसे आणता येतील यासाठी धावपळ करण्याऐवजी सध्या वैदर्भीय लोकप्रतिनिधी नागपुरात शुभेच्छा फलकांसाठी मोक्याच्या जागा शोधण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे यावेळच्याही अधिवेशनात प्रश्नांऐवजी फलकबाजीचाच बोलबाला राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
 विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या १० डिसेंबर पासून नागपूरात सुरूवात होत आहे. या अधिवेशनाच्या तयारीवर सध्या प्रशासकीय वर्तुळाकडून अखेरचा हात फिरवला जात आहे. विधीमंडळ सचिवालयाचे कामकाज नागपूरात सुरू झाले आहे. विधीमंडळाचे ग्रंथालय सुध्दा अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. नागपूर करारानुसार होत असलेल्या या अधिवेशनात दरवर्षी विदर्भाचे प्रश्न सुटावेत, अशी अपेक्षा सर्वच स्तरावरून व्यक्त केली जाते. प्रत्यक्षात हाती काही लागत नाही असा अनुभव अनेकदा येतो. या अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भातील प्रश्न, समस्या मार्गी लागण्यासाठी विदर्भातील आमदारांकडून जोरकस प्रयत्न होतील अशी अपेक्षा केली जाते. या प्रश्नांची तड लागावी यासाठी या आमदारांनी पुढाकार घेत पक्षीय तसेच सर्वपक्षीय बैठका घेणे, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तसा माहौल तयार करणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात विदर्भातले आमदार या मुद्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही उदासीन असल्याचे चित्र सध्या आहे.
स्वत:च्या मतदारसंघातील प्रश्न व समस्यांविषयी गांभीर्य न पाळणारे हे आमदार फलकबाजीत मात्र समोर असल्याचे दुर्देवी चित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही तसेच आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने अख्खे मंत्रिमंडळ नागपुरात असते. या निमित्ताने राज्यातील मंत्र्यांना शुभेच्छा फलकांच्या माध्यमातून खुश करण्यासाठी सध्या विदर्भातील आमदारांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. जाहिरात क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार अधिवेशनाच्या काळात एकटय़ा नागपूरात किमान सात हजार फलक लागतात. यात अंदाजे ३५० मोठे, ६०० मध्यम आकाराचे फलक असतात. उर्वरित ६ हजार फलक छोटे व रस्त्याच्या कडेला किंवा मधोमध असतात. या फलकांच्या जागा निश्चित करण्यासाठी सध्या सर्वच पक्षाचे आमदार व त्यांचे कार्यकर्ते धावपळ करीत आहेत.
मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांची वाहने ज्या मार्गानी जाणार आहेत ते मार्ग स्वागतपर फलकांनी आता जागा व्यापू लागले आहेत. विदर्भातील आमदार केवळ फलक लावत नाहीत तर फलक लावले हे सिध्द करणारी छायाचित्रे सुध्दा नंतर अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांच्या टेबलवर ठेवतात. आपण मंत्र्याच्या किती जवळचे आहोत हेच दाखवण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या निमित्ताने आमदारांकडून होतो. आमदारांनी मंत्र्यांना खुश करण्यात काही गैर नसले तरी या माध्यमातून किमान विकासाची कामे तरी मार्गी लागावी अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात त्याकडेच साऱ्यांचे दुर्लक्ष होते. या साऱ्या प्रकारामुळे अधिवेशनासाठी विदर्भात येणारे मंत्रिमंडळसुध्दा बरेच निर्धास्त असते. वैदर्भीय आमदारांची प्रश्नांप्रती असलेली उदासीनता आणि फलकांप्रती असलेली सक्रियता विदर्भाचे मागासलेपण अधोरेखित करणारी आहे, अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.