शेकाप आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
रायगड जिल्ह्य़ातील वाढत्या चोऱ्या आणि दरोडे रोखण्यात रायगड पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील जनता भयभीत झाली आहे. जिल्ह्य़ातील ढासळणाऱ्या कायदा आणि सुरक्षेच्या प्रश्नाकडे लक्ष्य घालावे यासाठी शेकाप आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली आणि जिल्ह्य़ातील चोऱ्या दरोडय़ांच्या तपासाबाबत साकडे घातले. पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री ९च्या सुमारास धाडसी दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लाखो रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या वेळी दुकानदाराशी झालेल्या झटापटीनंतर एका दरोडेखोरास पकडण्यात व्यापारी आणि गावकऱ्यांना यश आले. मात्र, इतर दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. या दरोडय़ाच्या घटनेने जिल्ह्य़ात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडय़ाचा शोध घेण्यात मात्र पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षां या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी आ. जयंत पाटील यांच्यासोबत अलिबाग, पोयनाड, नागोठणे आदी ठिकाणचे व्यापारीदेखील होते. या वेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले की,पोयनाड येथील घटनेदरम्यान व्यापाऱ्याने आपल्या जिवाची बाजी लावत एका चोराला पकडले आणि त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरोडेखोरांपकी एकाला पकडून दिल्यानंतरही बाकीचे पळून जाण्यात यशस्वी झालेल्या दरोडेखोरांचा अद्याप तपास लागलेला नाही. जिल्ह्य़ातील नागोठणे, माणगाव आणि पोलादपूर येथे चोरीच्या घटना घडल्या, याबद्दल आ. जयंत पाटील आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांजवळ नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना व्यापाऱ्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून लवकरात लवकर परत देण्याची विनंती व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. शिष्टमंडळासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडचे पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांना दूरध्वनी केला आणि दरोडय़ाच्या घटनेवर सविस्तर चर्चा करीत या घटनेचा त्वरित तपास लावण्याचे निर्देश दिले. जपान दौऱ्यावरून परत येईपर्यंत या आणि इतर दरोडय़ांचा तपास न लागल्यास आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळात पोयनाड व नागोठणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मूलचंद जैन, प्रकाश भिकमचंद जैन, प्रमोद राऊत, विक्रम बोकडिया, दरोडय़ातील आरोपी पकडून देणारे भारत जैन, राजू जैन आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. जयंत पाटील यांच्याशी पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ रायगड जिल्ह्य़ातील वाढत्या चोरीच्या घटनांवर चर्चा केली.