भारतीय जनता पक्षाचे नेते विकासाच्या गप्पा मारत असले, तरी केवळ मूठभर लोकांचा विकास व्हावा, अशीच त्यांची इच्छा असल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लातूरमधील सभेत केले. पक्षाचे लातूरमधील उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतली. गेल्या आठवड्यात याच ठिकाणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. त्या सभेच्या तुलनेत राहुल गांधींच्या सभेला लातूरकरांचा कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते.
राहुल गांधी म्हणाले, विकास झाला पाहिजे, असे आम्हालाही वाटते. मात्र, त्याचे फायदे सर्वसामान्यांना मिळाले पाहिजेत, अशी आमची इच्छा आहे. भाजपच्या नेत्यांना मूठभर लोकांचा विकास साधण्याची इच्छा आहे. गरीब, आदिवासी, महिला यांना विकासाचे फायदे मिळू नयेत, असे त्यांना वाटते. भाजपने २००४च्या निवडणुकीत ‘इंडिया शायनिंग’चा नारा दिला होता. परंतु, देशात तशी परिस्थिती नव्हती. केवळ भाजपच्या नेत्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या गाड्यांमध्ये इंडिया शायनिंग दिसत होते.
नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलवरही राहुल गांधी यांनी हल्ला चढविला. ते म्हणाले, गुजरातमध्ये केवळ एका उद्योगसमूहाच्या विकासासाठी तेथील राज्य सरकार झटते आहे. मोदी आणि अदानी यांची पार्टनरशिप आहे. त्यामुळे एकट्या औरंगाबाद शहराइतकी जमीन एकाच उद्योगसमूहाला देण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वी या उद्योगसमूहाची संपत्ती तीन हजार कोटी होती. ती आता ४० हजार कोटींपर्यत गेली आहे. संपूर्ण राज्यात केवळ एकच उद्योगपती आहे, दुसरा कोणताच नाही, अशी तिथे स्थिती आहे. गुजरातमध्ये ४० टक्के लोकांना अजून पिण्याचे पाणी मिळालेले नाही. मोदींच्या काळात तेथील शेतकऱयांना, कामगारांना कोणताच फायदा झाला नाही, असे सांगून हे गुजरात मॉडेल नसून टॉफी मॉडेल असल्याची टीकाही त्यांनी केली.