काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी त्यांच्या अमरावती जिल्ह्यातील पदयात्रेदरम्यान शहापूर गावातील आत्महत्याग्रस्त किशोर कांबळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले. कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी कांबळे कुटुंबियांना सांगितले. राहुल गांधी हे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज सकाळी अमरावतीमधून त्यांच्या या दौऱ्याचा प्रारंभ झाला. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी १५ किलोमीटरची पदयात्रा करणार असल्याचे ठरले होते. त्यानुसार अमरावतीच्या गुंजी आणि शहापूरमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन राहुल गांधी आता रामगावकडे मार्गक्रमण करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक शेतकऱ्यांची भेट घेतली. सकाळी साडे आठच्या सुमारास राहुल यांनी गुंजी गावापासून पदयात्रेला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी शहापूरमध्ये येऊन आत्महत्याग्रस्त किशोर कांबळे कुटुंबिय़ांची भेट घेतली. आता ते रामगावात तुपे कुटुंबियांची भेट घेणार आहे. या पदयात्रेत अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील सर्व प्रमुख नेते राहुल गांधींबरोबर सहभागी झाले आहेत. सध्या विदर्भातील तापमान ४० अंशावर पोहचले असून पदयात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व काँग्रेस नेते आळीपाळीने राहुल गांधींची सोबत करत आहेत. मधल्या काळात हे नेते आपापल्या गाड्यांनी प्रवास करत आहेत. मात्र, राहुल गांधी अथकपणे चालत असून त्यांनी आत्तापर्यंत निम्मा प्रवास पूर्ण केला आहे. 
दरम्यान, गुंजी येथे पोहचण्यापूर्वी राहुल गांधींनी जागोजागी गाडी थांबवून त्यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या गावकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. राहुल गांधी तब्बल सात वर्षांनंतर विदर्भ दौऱ्यावर आले असून यावेळी ते आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांचे भूसंपादन विधेयकासंदर्भातील त्यांची मते जाणून घेतील.