काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी शिर्डी येथे साई दरबारात हजेरी लावून साईदर्शन घेतले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी गांधी सोमवारी लोणी येथे आले होते. येथे सायंकाळी त्यांची सभा झाली, त्यानंतर सोमवारी त्यांनी शिर्डी येथेच मुक्काम केला. मंगळवारी राहुल गांधी संस्थानच्या प्रसादालयात भोजन घेणार असल्याने त्यासाठी संस्थानने व्हीआयपी कक्षात जय्यत तयारीही केली होती. मात्र गांधी भोजनासाठी आलेच नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे हेच प्रसादालयात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य मंत्री विखे यांनी केले.
मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास गांधी यांचे मंदिर परिसरात आगमन झाले. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुजय विखे, प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे आदी या वेळी उपस्थित होते.
साई मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करताच त्यांनी रांगेतील भक्तांशी हस्तांदोलन केले. यानंतर त्यांनी समाधीची पाद्यपूजा केली. या वेळी दर्शनरांगाही सुरूच होत्या. पादुकांजवळील रांगा समोरून वळविण्यात आल्याने भक्तांच्या दर्शनात कोणताही व्यत्यय आला नाही. दर्शनानंतर समाधी मंदिरातील व्हीआयपी कक्षात डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते बाबांची मूर्ती देऊन तर जयंत ससाणे यांनी इंग्रजी साईसच्चरित्र देऊन गांधी यांचा सत्कार केला. तर कृषिमंत्री विखे यांनी पृथ्वीराज चव्हाण, मोहन प्रकाश व माणिकराव ठाकरे यांना मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. दरम्यान, तत्पूर्वी सकाळी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी राहुल गांधी व मोहन प्रकाश यांच्याशी चर्चा केली.