रायगड जिल्ह्य़ातील किनारपट्टीवर वाहून येणाऱ्या रसायनयुक्त पिंपांचे गूढ अजूनही कायम आहे. जिल्ह्य़ातील विविध भागांतील समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या पिंपांची संख्या आता पन्नासच्या घरात गेली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्य़ातील समुद्रकिनाऱ्यावर ज्वालाग्रही रसायनाने भरलेले पिंप वाहून येण्याचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्य़ात गेल्या चार दिवसांत पन्नासहून अधिक पिंप भरतीच्या पाण्यासोबत वाहून आले आहेत. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५, अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०, दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३, तर मुरुड, श्रीवर्धन आणि मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी १ पिंप आढळून आले आहेत. याशिवाय रसायनाने भरलेले ५ कॅनही आढळून आले आहेत. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात भीतीचे वातावरण आहे.
खोल समुद्रातून भरतीच्या पाण्यासोबत वाहून येणारे हे पिंप नेमके कुठून येत आहे. त्यात कोणते रसायन आहे याबाबतचे गूढ मात्र कायम आहे. या पाश्र्वभूमीवर रायगड किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील गस्त वाढविण्यात आली असून तटरक्षक दल आणि पोलिसांच्या गस्ती नौकाच्या माध्यमातून तपासकार्य सुरू  करण्यात आले आहे. स्थानिक मच्छीमार आणि सागर सुरक्षा बलाच्या जवानांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, गुजरात आणि गोव्यातील पोलिसांना या संशयास्पद पिंप वाहून येत असल्याबाबत सूचित करण्यात आले आहे. किनारपट्टीवर संशयास्पद पिंप, बोटी अथवा व्यक्ती आढळून आल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला सूचित करण्याचे आवाहन रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक राजा पवार यांनी केले आहे. या पंपामध्ये ज्वालाग्रही रसायन असल्याने नागरिकांनी हे पिंप उघडण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  दरम्यान, पिंपातील रसायनाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी अजून १० ते १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. स्थानिक मच्छीमारांच्या माहितीनुसार खोल समुद्रात आणखीन काही पिंप तरंगतांना दिसत आहेत हे पिंप येत्या एक-दोन दिवसांत किनारपट्टीवरील भागात लागण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्य़ात किनारपट्टीवरील भागात संशयित वस्तू आढळण्याची ही पहिली वेळ नाही. जिल्ह्य़ात यापूर्वी अनेकदा अशा संशयास्पद वस्तू किनारपट्टीवर आढळून आल्या आहेत. दोन ते तीन वर्षांपूर्वी मांडवा समुद्रकिनाऱ्यावर स्फोटकसदृश पेटय़ा आढळून आल्या होत्या. खलिजा आणि चित्रा जहाजांच्या अपघातानंतर रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनाऱ्यांवर कंटेनर वाहून आले होते. एम व्ही पवित बोटीला अपघात झाल्यानंतर रायगड किनारपट्टीला तेल तवंग वाहून आला होता. चार ते पाच वर्षांपूर्वी श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर बार्ज वाहून आले होते. १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटाची स्फोटके रायगडमधील शेखाडी परिसरात उतरवण्यात आली होती.