रायगड जिल्हा नियोजन भवनाचे काम रखडले आहे. कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे हे काम आता पुन्हा दिलेल्या मुदतीत पूर्ण होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

जिल्हा नियोजन मंडळाची इमारत जीर्ण झाल्याने ती पाडून नवीन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन वर्षांंपूर्वी नियंत्रित स्फोटांच्या साह्य़ाने जुनी इमारत पाडण्यात आली होती. जिल्ह्य़ाचे तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते.

या इमारतीसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून ८ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. अत्याधुनिक पद्धतीच्या या दोन मजली इमारतीवर प्रत्येक मजल्यावर सव्वा चारशे स्क्वेअर मीटर असे एकूण १२७५ मीटर बांधकाम केले जाणार आहे. यात नियोजन मंडळाच्या १७० जणांना बसता येईल. अशा सुसज्ज सभागृह, जिल्हानियोजन अधिकारी कार्यालय, वाहनतळ यांचा समावेश आहे. ही  इमारत डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.

मात्र मुदत उलटून एक वर्ष लोटले असले तरी इमारतीचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. इमारतीचा सांगाडा उभारून पूर्ण झाला असला, तरी अंतर्गत सजावट, विद्युतीकरण, प्लंबिग आणि फ्लोअरिंगची कामे रखडली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमारतीच्या बांधकामासाठी लागणारा ६ कोटींचा निधी यापूर्वीच बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. पण तरीही इमारतीचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होऊ शकलेले नाही. कामाची गती पाहता अजून पाच ते सहा महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यताही दिसत नाही.

कधी रेती नसल्याचे, कधी निधी मिळत नसल्य़ाचे कारण देत कंत्राटदाराने काम बंद ठेवले आहे. त्यामुळे वाढीव मुदतीत हे काम पूर्ण होणार नसल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.

नियोजन भवनाच्या कामासाठी निधीची कमतरता नाही. पुढील कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यांनी कंत्राटदाराकडून काम पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.

 –सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड