क्रीडा संकुलाचा उपयोग जर खेळांडूंसाठी होणार नसेल तर अशी संकुले काय कामाची, शासनाकडून या संकुलांच्या देखभालीसाठी दिला गेला पाहिजे अन्यथा ही क्रीडा संकुले आíथकदृष्टय़ा सक्षम एजन्सीजला चालवायला द्यायला हवीत, येत्या अधिवेशनात याकडे आम्ही सरकारचे लक्ष वेधू. ’ असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
कोटय़वधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले नेऊली येथील जिल्हा क्रीडा संकुल वापराविना पडून आहे. देखभालीअभावी संकुल परिसरात सध्या रानटी झुडपांचे साम्राज्य पसरले असल्याचे सध्या पाहायला मिळते आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या क्रीडांगणावर खेळाडूंचा वावर असायला हवा त्या ठिकाणी सध्या प्रेमीयुगल आणि मद्यपीचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्घाटनानंतरही रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचा वनवास सुरूच असल्याचे बोलले जाते आहे.

जिल्हा क्रीडा संकुल खेळाडूंसाठी उपलब्ध होण्यासाठी रायगडकरांनी तब्बल तीन दशकांची वाट पाहावी लागली होती. हे क्रीडा संकुल पूर्ण झाले म्हणून २०१५ जून महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही हे संकुल वापराविना पडून आहे. त्यामुळे उद्घाटनानंतरही क्रीडा संकुलाचा वनवास सुरूच आहे.
जिल्हा क्रीडा संकुलासाठी १९८५ साली अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील १० एकर जागा संपादित करण्यात आली. त्यानंतर या जागेवर संरक्षण िभत बांधण्याव्यतिरिक्त कोणतेही काम झाले नव्हते. २००१ सालच्या क्रीडाधोरणानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातजिल्हा क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. २००३ साली काढण्यात आलेल्या राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार रायगड जिल्हा क्रीडा सकुलासाठी ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यात ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक, इंडोअर क्रीडाप्रकारांसाठी हॉल, विविध खेळांची मदाने, तरणतलाव, व्यायामशाळा, प्रेक्षागॅलरी यांचा समावेश होता. दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.
पहिल्या टप्प्याच्या कामाला २००५ साली प्रत्यक्ष सुरुवात झाली. यात प्रामुख्याने बहुउद्देशीय इनडोअर क्रीडा संकुल, व्यायामशाळा, प्रेक्षागृह आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि खेळाडूंच्या राहण्यासाठी वसतिगृह व्यवस्था यांचा समावेश होता. २००९ साली हे काम पूर्ण झाले. तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते या इमारतींचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पणानंतर क्रीडा संकुल परिसराचा वापर सुरू होईल अशी अपेक्षा होती. परंतु पाणी नसल्यामुळे त्याचा वापर झाला नाही.
इनडोअर संकुल तयार झाले असले तरी आऊटडोअर मदानांची कामे अद्याप बाकी होती. यात प्रामुख्याने फुटबॉल मदान, ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक, कबड्डी व खो-खो मदान, लॉन टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, तरणतलाव, क्रिकेटची खेळपट्टी या कामांचा समावेश होता. मात्र त्यासाठी निधी कमी पडत असल्याचे लक्षात आले. राज्य शासनाने या क्रीडा संकुलासाठी आणखी ४ कोटी ७८ लाख रुपये मंजूर केले. २०११ पासून दुसऱ्या टप्प्याचे म्हणजेच आऊटडोअरचे काम सुरू करण्यात आले. २०१४ अखेपर्यंत यातील काही मदानांची तसेच तरण तलावाची कामे पूर्ण झाली. मात्र क्रीडा संकुलासाठी लागणारे पाणी आणि वीजपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता झालीच नाही.
क्रीडा संकुलाचे काम अपूर्णावस्थेत असतानाच, तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनीता रिकामे आणि जिल्हा क्रीडा समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी यांनी २०१५ च्या जून महिन्यात या क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पाडून घेतला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकुलाचे लोकार्पणही केले. मात्र पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने हे सुसज्ज क्रीडा संकुल वापराविना पडून राहिले. देखभालीअभावी आज क्रीडा संकुल परिसरात रानटी झाडांचे वास्तव्य पाहायला मिळत आहे. क्रीडा संकुलाचा ताबा दिवसा प्रेमीयुगलांनी तर रात्री मद्यपींनी घेतल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
ज्या क्रीडा संकुलासाठी रायगडकरांनी तब्बल तीन दशकांची वाट पाहिली. ते अस्तित्वात येऊनही उपयोग झालेला दिसून येत नाही. वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधाच नसल्याने आजही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे कार्यालय या संकुलात स्थलांतरित झाले नाही. ज्या जिल्ह्याने राज्याला कबड्डीमध्ये आशीष म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, संजय मोकल, विजय म्हात्रे, क्रिकेटमध्ये अक्षय दरेकर, सागर सावंत, भरत सोलंकी, तर सायकिलग स्पर्धामध्ये योगिता शिळधणकर आणि दीपाली शिळधणकरसारखे खेळाडू दिले त्या रायगडात क्रीडा संकुलाच्या नशिबी उदासीनतेचा वनवास यावा ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे मत क्रीडाप्रेमीकडून केले जाते आहे.

हर्षद कशाळकर