शीना बोरा हत्याप्रकरण आता रायगड पोलिसही चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. हत्या प्रकरणातील तपासात निष्काळजीपणा केल्याचा ठपका पोलीस अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल कोकण विभागाचे महापरिनिरीक्षक यांना लवकरच सादर केला जाईल, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली.
गागोदे िखड येथे जंगलात २३ मे २०१२ रोजी एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह दिसला. तिने याबाबतची माहिती पेण पोलीस ठाण्याच्या वरसई दूरक्षेत्रच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिक्षक प्रदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक सुदेश मिरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धांडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. या वेळी मृताचे अवशेष मुंबईतील जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते.
तशी नोंद ठाण्याच्या डायरीत केली होती. मात्र मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली नाही, तसेच प्रथमदर्शनी हा खून असल्याचे दिसत असूनही गुन्हा दाखल करून घेतला नाही, अशी माहिती हक यांनी दिली.
कोकण विभागाचे महापरिनिरीक्षक प्रशांत बुरुडे यांनी या प्रकरणात बेपर्वाई दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात येईल. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक सुदेश मिरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धांडे या तीनही अधिकाऱ्यासह तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.
मुंबई पोलीसांच्या पथकाने शुक्रवारी घटनास्थळाची तपासणी केली. यावेळी रायगड पोलीसांचे पथकही त्यांच्या सोबत होते. दरम्यान रायगड जिल्ह्य़ात गेल्या काही वर्षांत गागोदे आणि पोलादपुर परिसरात अनेक अनोळखी मृतदेह सापडण्याच्या घटना घडल्या आहेत. शीना बोरा हत्याप्रकरणानंतर या घटनांची पुर्नतपासणी करण्याचे आदेश संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.