रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी सादर केलेल्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला मिळालेला हिरवा कंदील कोकणातील बंदरविकासाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल, असा अंदाज आहे.
सुमारे १०७ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी ३ हजार ४५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सुमारे साडेचार वर्षांत तो पूर्ण करण्याचा इरादा आहे. या मार्गावर एकूण २७ बोगदे राहणार असून त्यापैकी ३ बोगदे दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे आहेत. सर्वात मोठय़ा बोगद्याची लांबी ३.९६ किलोमीटर आहे.
त्याचबरोबर या रेल्वेमार्गावर एकूण २५ मोठे पूल बांधले जाणार असून लहान पुलांची संख्या ७४ आहे. तसेच मार्गावर एकूण १० स्थानके उभारण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागातील चिपळूण-कराड या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर कोकणच्या दक्षिणेकडे होणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गामुळे या परिसरातील बंदरविकासाला चालना मिळेल, असा विश्वास कोकण रेल्वे महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी व्यक्त केला. रत्नागिरी तालुक्यातील जयगड ते संगमेश्वर तालुक्यातील डिंगणीपर्यंतच्या रेल्वेमार्गाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. कोल्हापूर-वैभववाडी मार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीसह अन्य बंदरांमधील मालाच्या चढ-उताराला गती मिळणार आहे.
या व्यतिरिक्त रेल्वेला लागणाऱ्या विविध प्रकारच्या सुटय़ा भागांच्या निर्मितीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात कारखाना उभारण्याचाही प्रस्ताव आहे. त्यासाठी सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.