भुसावळ रेल्वे विभागाने नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या नियमित तिकीट तपासणी मोहिमेंतर्गत अनियमितपणे प्रवास करणारे, विना तिकीट प्रवास क रणारे आणि सामानाची नोंदणी न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल दोन कोटी २१ लाख रुपयांचा दंड वसूल केला. रेल्वे विभागात या विभागाने विक्रमी दंड वसूल करण्याचा मान पटकावला आहे.
या बाबतची माहिती भुसावळ रेल्वे विभागाचे वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोटीकर यांनी दिली. रेल्वे प्रबंधक एम. के. गुप्ता, अतिरिक्त मंडळ प्रबंधक प्रदीप बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नोव्हेंबर महिन्यात सहाय्यक वाणिज्य प्रबंधक विजय नायर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. त्यात विहित नियमांचे पालन न करता प्रवास करणारी ४३ हजार २८८ प्रकरणे नोंदविली गेली. त्यात संबंधित प्रवाशांकडून दोन कोटी २१ लाखांची दंडात्मक वसुली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विनय ओझा, आर. के. गुप्ता, एस. के. दुबे, आर. के. केसरी, अमित शर्मा, एस. के. गुप्ता, एल. के. सिंग, एस. एस. सावे आणि राजेंद्र पसाद या तिकीट निरीक्षकांनी प्रत्येकी पाच लाखाहून अधिकचा दंड अनियमित प्रवाशांकडून वसूल केला. या मोहिमेत भुसावळ विभागातील खंडवा, भुसावळ, बडनेरा, अकोला, मनमाड, नाशिक आदी रेल्वे स्थानकांवरील तिकीट निरीक्षकांचेही महत्वपूर्ण योगदान होते. प्रवाशांनी नियमानुसार तिकीट घेवूनच प्रवास करावा, असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य रेल्वे प्रबंधक एन. जी. बोरीकर यांनी केले आहे.