मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात विशेषत: सोलापूर-पुणे लोहमार्गावर रेल्वेगाडय़ांवर पडणारे दरोडे व त्यात होणारी सशस्त्र लूटमार ही सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने गंभीर आणि तेवढीच संवेदनशील बाब म्हटली जाते. रेल्वेगाडय़ा लुटण्याच्या बहुतांश घटना माढा व करमाळा तालुक्यात घडतात. हा संपूर्ण भाग केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदार संघात मोडला जातो. दुसरीकडे याच सोलापूर जिल्ह्य़ातून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रतिनिधित्व करतात. परंतु हे दोघे वजनदार सत्ताधीश नेते असूनही सोलापूरच्या रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता सदैव टांगणीला असते.
मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे एकूण क्षेत्र ९५२ किलोमीटर एवढे लांबीचे असून यात सोलापूरसह वाडी, गुलबर्गा, कुर्डूवाडी, दौंड, मिरज, नगर, साईनगर, शिर्डी, मनमाड, लातूर आदी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांसह एकूण १०४ स्थानके समाविष्ट आहेत. कर्नाटक व महाराष्ट्रातील सात जिल्ह्य़ांचा यात समावेश आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावरून दररोज ४५ रेल्वे गाडय़ा मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरु, चेन्नई, कोचीन आदी महत्त्वाच्या महानगरांसाठी धावतात. सोलापूर रेल्वे स्थानकावर दररोज सरासरी २० हजार प्रवासी रेल्वे प्रवासाचा लाभ घेतात. तर एकूण सोलापूर विभागात दररोजच्या प्रवाशांची संख्या सुमारे ८० हजार एवढी आहे. उत्पन्नाच्या बाबीचा विचार केला असता मध्य रेल्वेच्या एकूण पाच विभागांपैकी मुंबई व नागपूरनंतर सोलापूर विभागाचा तिसरा क्रमांक लागतो.
या पाश्र्वभूमीवर सोलापूर विभागात सुधारणांसाठी विविध विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून यात पुणे ते गुंटकलपर्यंत लोहमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतिकरणाचे काम महत्त्वाकांक्षी स्वरुपाचे आहे. १६०० कोटी रु. खर्चाचा हा प्रकल्प येत्या दोन-तीन वर्षांत कार्यान्वित झाला तर या मार्गावरील रेल्वेवाहतूक आणखी वाढू शकते. सद्य:स्थितीत सोलापूर विभागाच्या प्रशासनाने आगामी २०१३ – १४ वर्षांच्या रेल्वे अर्थ संकल्पासाठी सात नवीन रेल्वे गाडय़ांचा प्रस्ताव तयार करून पाठविला आहे. यात एखाद दुसऱ्या गाडीला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
या सर्व बाबींचा साकल्याने विचार करता रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मात्र त्याबाबत प्रशासन गंभीर दिसत नाही. किंबहुना पुरेशा सुरक्षा मनुष्य बळाच्या उपलब्धतेसाठी सोलापूर विभागाने पाठविलेला प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे अनेक दिवसांपासून धूळ खात पडून आहे. सोलापूर विभागात आरपीएफचे मंजूर मनुष्यबळ ४५० एवढे आहे. मात्र प्रत्यक्षात ३३० एवढेच मनुष्यबळ उपलब्ध असून १२० ची कमतरता आहे. हे कमी असलेले मनुष्यबळ उपलब्ध होणे सहजशक्य आहे. विशेषत: मागील वर्ष-दीड वर्षांत रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवाशांना लुटण्याचे वाढलेले प्रकार विचारात घेता पुरेसे आवश्यक सुरक्षा मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी पुरेशा प्रमाणात घेतली जाणार नसेल तर या दोन्ही बलाढय़ नेत्यांची स्थानिक रेल्वे प्रवाशांच्यादृष्टीने उपयुक्तता काय, असा सवाल उपस्थित होत आहे. पवार व शिंदे हे दोघे नेते सोलापूर जिल्ह्य़ासाठी लाभले असताना त्याचा एकीकडे सर्वाना हेवा वाटत असला तरी रेल्वे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न विचारात घेतला तर ‘बडा घर – पोकळ वासा’ या म्हणीचा प्रत्यय येतो.