दिल्ली-नागपूर मार्गावरील इटारसी रेल्वे स्थानकावर आरआरआय कक्षाला लागलेल्या आगीमुळे विस्कळीत झालेली वाहतूक दोन आठवडे झाले तरी अद्याप रुळावर आलेली नाही. एखादी घटना संपूर्ण देशातीलच रेल्वे वाहतूक ठप्प पाडू शकते हे यामुळे उघड झाले आहे. दुसरीकडे, ज्या कारणांमुळे हा प्रसंग आला त्या आरआरआयबाबत जाणून घेण्यासाठी कमालीची उत्सुकता वाढली आहे. साधारणपणे गाडय़ांचे सुरक्षित ये-जा व्हावी यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा म्हणजे आरआरआय. ती किती महत्वाची आहे, हे या अपघातामुळे स्पष्ट झाले आहे.

वाहतूक का कोलमडली
देशभरात एकाचवेळी हजारो मार्गांवर हजारो गाडय़ा धावतात. एका सेक्शनमध्ये एक किंवा दोन गाडय़ा धावतात. एखाद्या स्थानकावरील आरआरआयमध्ये बिघाड आल्यास त्या स्थानकावर गाडय़ा येऊ किंवा तेथून जाऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाडय़ा रद्द किंवा अन्य मार्गाने वळविण्यात येतात, परंतु इतर मार्ग व्यस्त असतात. त्यामुळे गाडय़ा वळवण्यावरही मर्यादा येतात. अशा परिस्थितीत गाडय़ा रद्द करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गाडय़ा रद्द केल्यानंतर परत त्या वेळापत्रकानुसार नियमित करण्यासाठी बराच कालावधीत जावा लागतो. देशात गाडय़ांच्या संख्येप्रमाणे रेल्वेमार्गांची कमतरता हीच मोठी समस्या आहे. एकामागे एक एकेका सेक्शनमध्ये गाडय़ा धावतात. समोरच्या गाडीला विलंब झाल्यास मागच्या गाडीला विलंब होतो.

असे होते संचालन
नागपूरच्या मुख्य स्थानकावरील आरआरआयमध्ये पॅनल इंटरलॉकिंग प्रणाली आहे. मालगाडी उभी करण्यासाठी, शंटिंगसाठी असलेल्या रूळ आणि सर्व सिग्नल्स, पाईट्सचे नियंत्रण या कक्षातून होते. या पॅनलवर आरआरआय नियंत्रण असलेले सर्व मार्ग, पाईन्ट्स आणि सिग्नल यासह गाडय़ांची सद्यस्थितीची सर्व माहिती कळते. येथील तंत्रज्ञ नियंत्रण कक्षातून दूरध्वनीवरून किंवा वॉकीटॉकीवरून संदेश देतो. त्यानंतर ते मार्ग, पाईन्ट्स क्लिअर करून सिग्नल दिले जातात. येथे दोनच प्रकारचे सिग्नल दिले जातात. एक पिवळा आणि हिरवा. आरआयआर कक्षात ऑपरेटिंग, सिग्नलिंग आणि दूरसंचार खात्याचे कर्मचारी असतात. सोबत उद्घोषक बसलेले असतात, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आरआरआय (रुट रिले इंटरलॉकिंग) म्हणजे काय?
रेल्वे गाडय़ांची धडक होऊ नये म्हणून सिग्नल्स आणि रुळांचे पाईंट्सची अशी रचना केली जाते की, एक गाडी असताना त्या सेक्शनमध्ये दुसऱ्या गाडीला जाताच येणार नाही. जोपर्यंत ‘आरआरआय’ कक्षातून सिग्नल्स आणि पाईन्ट्स स्पष्ट केले जात नाही तोपर्यंत दुसरी गाडी त्या सेक्शनमध्ये जाऊ शकत नाही. एका कक्षातून विशिष्ट भागातील सिग्नल आणि पाईंट्स यांच्यात समन्वय साधण्यासाठी विविध योजना विकसित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक पॅनल इंटरलॉकिंग प्रणाली बहुतांश रेल्वे स्थानकावर उपयोगात आणली जात आहे. यात पाईन्ट्स आणि सिग्नल वेगवेगळ्या स्विचद्वारे नियंत्रणात आणले जातात. रुट रिले इंटरलॉकिंग प्रणाली मोठय़ा आणि व्यस्त रेल्वे स्थानकांसाठी वापरण्यात येते. या प्रणालीद्वारे रेल्वे स्थानकावरील संपूर्ण मार्गाची निवड केली जाते. मार्गास सर्व पाईंट्स आणि सिग्नल्स एकाच वेळी एक कळ दाबून नियंत्रित केले जातात. गाडी रेल्वे स्थानकावर घेणे, थांबवून ठेवणे किंवा रेल्वे स्थानकावरून गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना करणे आदी सर्व बाबी आरआरआय कक्षातून नियंत्रित केल्या जातात.

वाहतूक का कोलमडली
देशभरात एकाचवेळी हजारो मार्गांवर हजारो गाडय़ा धावतात. एका सेक्शनमध्ये एक किंवा दोन गाडय़ा धावतात. एखाद्या स्थानकावरील आरआरआयमध्ये बिघाड आल्यास त्या स्थानकावर गाडय़ा येऊ किंवा तेथून जाऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाडय़ा रद्द किंवा अन्य मार्गाने वळविण्यात येतात, परंतु इतर मार्ग व्यस्त असतात. त्यामुळे गाडय़ा वळवण्यावरही मर्यादा येतात. अशा परिस्थितीत गाडय़ा रद्द करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गाडय़ा रद्द केल्यानंतर परत त्या वेळापत्रकानुसार नियमित करण्यासाठी बराच कालावधीत जावा लागतो. देशात गाडय़ांच्या संख्येप्रमाणे रेल्वेमार्गांची कमतरता हीच मोठी समस्या आहे. एकामागे एक एकेका सेक्शनमध्ये गाडय़ा धावतात. समोरच्या गाडीला विलंब झाल्यास मागच्या गाडीला विलंब होतो.
इटरासी व्यस्त जंक्शन
इटारसी हे देशातील व्यस्त रेल्वे जंक्शनमध्ये पैकी एक आहे. हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वे मार्ग आणि दिल्ली-झांशी-भोपाळ-नागपूर आणि चेन्नई रेल्वे मार्गावर इटारसी आहे. यामुळे या रेल्वे स्थानकावरील आरआरआय यंत्रणा कोलमडल्याने देशातील महानगरांसाठी धावणाऱ्या रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
– राजेश्वर ठाकरे