रेल्वेमार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे रेल्वेचा प्रवास अलीकडे काहीसा धोकादायक वाटू लागला आहे. त्यातच आता मालाची मोठय़ा प्रमाणात होणारी वाहतूकही असुरक्षित असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मालमोटारीतून मालाची ने-आण करण्यापेक्षा रेल्वेने व्यापारी मोठय़ा प्रमाणात माल मागवतात किंवा पाठवतात. लातूर रेल्वेला दरमहा मालवाहतुकीतून किमान दोन कोटी रुपयांचा महसूल मिळतो. सोलापूर विभागात सर्वाधिक महसूल देणारे रेल्वेस्थानक म्हणून लातूरची नोंद आहे. मात्र, लातूर रेल्वेस्थानकावर येणारा माल सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. गोदामाबाहेर मोठय़ा प्रमाणात माल साठवावा लागतो. याशिवाय रेल्वेच्या रॅकमधून येणारा माल सुरक्षित राहीलच, याची शक्यता नसते. प्रत्येक रॅकला रिबिट, सील लावले गेले पाहिजे. त्याऐवजी अनेक रॅकला केवळ लोखंडी तारेने गुंडाळल्याचे आढळून येते. शासकीय मालाची बऱ्याच वेळा यातून चोरी होते. या प्रकाराकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.
मळवटी रस्त्यावर उड्डाणपूल नसल्याने काही वेळा अध्र्या तासापेक्षा अधिक लोकांना ताटकळत थांबावे लागते. हरंगुळ रेल्वेस्थानकावर पॅसेंजर रेल्वेला थांबा दिला असला, तरी या ठिकाणी रेल्वेचा अधिकृत कर्मचारी नसतो. या मार्गावर पुरेसे कर्मचारीही रेल्वेने नियुक्त न केल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. केवळ ५ पोलिसांवर कुर्डुवाडी ते लातूररस्ता मार्गावरील संरक्षण सोपवले आहे. मात्र, त्यामुळेच चिंता वाढल्याचे मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे लातूर जिल्हाध्यक्ष शिवाजी नरहरे यांनी सांगितले.