अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोडून पडलेला शेतकरी अजूनही सावरला नसतानाच जिल्ह्य़ातील भूम, परंडा तालुक्यांना बुधवारी पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने उरले-सुरले पीकही शेतकऱ्यांच्या हातून गेले. कळंब तालुक्यात मस्सा (खं) येथे वीज पडून शेतमजुराचा, तर उस्मानाबाद तालुक्यातील उसबे तडवळा येथे महिलेचा मृत्यू झाला.
उस्मानाबादसह भूम, कळंब व परंडा तालुक्यांत दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसाने शिवारात काढून ठेवलेल्या पिकांची मोठय़ा प्रमाणात नासाडी केली. भूम परिसरात वादळी वाऱ्यासह काही वेळ गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी अधिकच धास्तावला. महिनाभरापूर्वी झालेल्या गारपिटीच्या तडाख्यातून कसाबसा सावरत असलेला शेतकरी पुन्हा आलेल्या वादळी पावसामुळे अजून खचून गेला.
कळंब तालुक्यातील मस्सा येथे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. याच गावात बुधवारी दुपारी झाडावर वीज पडल्यामुळे उत्तम भागवत घोळवे या शेतमजुराचा मृत्यू झाला, तर उसबे तडवळा येथे संध्याकाळी वीज कोसळून मंगल अरुण पवार या महिलेचा मृत्यू झाला.