शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्ह्याच्या बहुतांशी भागात रात्रभर जिरवणीचा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील वातावरण उन्हाळी की पावसाळी असा प्रश्न पडला आहे. गेले २० दिवस जिल्ह्यात पावसाबरोबरच ढगानींही मुक्काम ठोकल्याने ऐन हंगामात दडी मारतो की काय? याची भीती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. पावसाबरोबरच अभूतपूर्व वादळ-वाऱ्यासह गारपिटीचा मोठय़ा प्रमाणात तडाका उन्हाळी पिकांना बसला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागापेक्षा दुष्काळी टापूतील पूर्व भागात जोरदार वादळ-वाऱ्यासह दररोज पावसाची हजेरी लागत आहे. काल रात्री सुरू झालेला चिटका रात्रभर सुरू होता. अगदी शुक्रवारी सकाळपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. मात्र या पावसासोबत वारे अथवा गारा यांचा मारा नव्हता.
गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात उन्हामुळे तापमापकातील पारा ४० अंशांपर्यंत पोहचण्याच्या टप्प्यात होता. उन्हाचा चटका जाणवू लागला होता. मात्र या उन्हासोबतच कमी अधिक प्रमाणात उन्हाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमान ३५ अंशांपर्यंत स्थिरावले आहे. दिवसभर ढगांची गर्दी आकाशात दिसत असल्याने सायंकाळीच पावसाचे आगमन होई अशी परिस्थिती नाही. केव्हाही काळ्या ढगांची गर्दी होते आणि अचानक पावसाची रिपरिप सुरू होते. हा पाऊस वाऱ्यामुळे दीर्घकाळ पडत नसल्याने ओढय़ा-नाल्यांना पाणीही आलेले नाही. मात्र नांगरटीच्या रानात ढेकळे फुटण्याइतपत पाऊस झाल्याने पेरणी पूर्व मशागतीची कामे जोरात सुरू झाली आहेत.
उन्हाळी पावसाने ३ आठवडय़ांचा मुक्काम ठोकल्याने खरिपासाठी आवश्यक असणाऱ्या हंगामातील नक्षत्रांचा पाऊस गायब होण्याची भीती जुने शेतकरी व्यक्त करीत आहेत. कारण गारपिटीसह पडणारा पाऊस हा गर्भाळ नक्षत्राचा पाऊस म्हणून ओळखला जातो. बिगर हंगामी हा पाऊस होत असल्याने हक्काची आणि आवश्यक नक्षत्रे कोरडी जाण्याचा धोका असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे.