कर्जत व जामखेड तालुक्यात बुधवारी मध्यरात्री मुसळधार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने अनेक शेतक-यांचा कांदा भिजला तसेच जोरदार वाऱ्यामुळे डाळिंब, चिकू, कागदी लिंबे, आंबा या  फळबागांचे मोठे नुकसान झाले. या दोन्ही तालुक्यांत सुरू झालेले हे सुलतानी संकट काही केल्या थांबण्यास तयार नसल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.
कर्जत व जामखेड तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून दररोज विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस सुरू आहे. वादळी पावसामुळे पिके व जनावरांच्या गोठय़ांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या हवेत तीव्र उष्णता आहे. रात्रीच्या वेळी किंवा दिवसाही अचानक आकाशात काळे ढग येतात व प्रचंड गडगडाट सुरू होतो. कधी तर पाऊस न पडताही विजांचा जोरदार गडगडाट सुरू असतो, तो कमालीचा भीतिदायक वाटतो. तालुक्यात वीज पडून आत्तापर्यंत दोघे दगावले आहेत.
गेल्या वर्षी दुष्काळ होता. आता गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. तालुक्यात यंदा कांद्याचे पीक भरपूर आहे, मात्र भाव नाही. अनेक शेतक-यांनी कांदा काढला असून, भाव नसल्याने ओला कांदा रानातच सुकण्यासाठी टाकला आहे, मात्र पावसाने तोही भिजतो आहे.
उन्हाळय़ात शेतक-यांची नांगरटीची कामे सुरू असतात. या काळात जमीन नांगरून ती मोकळी करून चांगली तापण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पुढचे पीक जोमाने येते. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतक-यांची नांगरटही खोळंबली आहे. त्याला विलंब झाला तर पुढची मशागतीची कामेही लांबणार आहेत.
पावशाचा संकेत आणि निसर्गचक्र
पूर्वी आकाशात ढग जमा झाले, की शेतकरी आनंदी व्हायचा. आता मात्र आकाशात ढग दिसू लागले व विजेचा गडगडाट सुरू झाला की शेतकरी भयभीत होत आहे. पावसाळय़ाच्या तोंडावर पावशा पक्षी त्याचा पिऽयूऽऽ असा आवाज काढून ओरडू लागला, की शेतकरी हा पावसाचा संकेत मानत. आताही रोज पहाटे पावशाची साद ऐकू येऊ लागली असून अवकाळी पाऊसही सुरूच आहे. त्यामुळे निसर्गचक्र बदलले की काय, अशी चर्चा सुरू आहे.