महाबळेश्वर पाचगणी येथे आज अचानक आवकाळी पावसाने हजेरी लावल्याने एकदम अल्हाददायक वातावरण झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. संध्याकाळी पर्यटकांनी मावळत्या सूर्याचे आकर्षक दर्शन घेतले.
    मागील दोन तीन दिवसांपासून वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथे ढगाळ वातावरण होते. सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे पर्यटकांनी मोठी गर्दी या परिसरात केली आहे. आज अचानक दुपारी तीनच्या सुमारास महाबळेश्वर येथे विजांच्या कडकडात जोरदार पावसाला सुरवात झाली. चांगला दोन तास जोरदार पाऊस झाला. पाचगणीत अर्धातास पाऊस झाला तर वाईत किरकोळ पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वर पाचगणीत पावसाने अल्हाददायक वातावरण तयार झाले. त्याचा पुरेपूर फायदा पर्यटकांनी उचलला. पावसानंतर सूर्यदर्शन झाल्याने वातावरणात एकदम बदल झाला होता. मावळत्या सूर्याचे प्रतििबब आपल्या डोळयात व कॅमेऱ्यात साठवण्याची पर्यटकांमध्ये स्पर्धा लागली होती.  एकूणच अवकाळी पावसाने महाबळेश्वरकरांना सुखद धक्का दिला. मात्र या पावसाने महाबळेश्वर परिसरातील वीजपुरवठा, बीएसएनएलची व भ्रमणध्वनीची रेंज गायब झाली होती, याचाही पर्यटकांनी आनंद लुटला.