रब्बी हंगामाच्या पेरणीस उशीर झाला असतानाच दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी सुखावले आहेत. रविवारी पहाटेपासून दुपापर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे रब्बीची रखडलेली पेरणी लवकरच वेग घेण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद व मुगापासून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. सप्टेंबरअखेपर्यंत रब्बी पेरण्या सुरू होणे अपेक्षित होते. १५ ऑक्टोबपर्यंत रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या असत्या, तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांगले उत्पादन मिळाले असते. परंतु परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पेरण्या लांबणीवर पडल्या.
दरम्यान, शेतकऱ्यांनी खरीप पीक काढणीनंतर शेतीची मशागत करून रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल, ज्वारी आदी पिकांच्या पेरणीची तयारी पूर्ण केली. दिवाळीचा सण साजरा झाल्यानंतर शेतकरी आतुरतेने परतीच्या पावसाची वाट पाहात होते. या पाश्र्वभूमीवर जिल्हाभर रविवारी पावसाची रिपरिप सुरू झाल्याने जमीन ओलसर झाली. या पावसावर शेतकरी पेरणी करून आणखी दोनतीन मोठय़ा परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असतील.
सूर्यदर्शन नाही, रस्ते चिखलमय
शनिवार व रविवार या दोन दिवशी जिल्ह्यात सूर्यदर्शन घडले नाही. शनिवारी ढगाळ वातावरण होते. परंतु हवेत गारवा होता. रविवारी मात्र पहाटे पाचला रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दुपारी तीनपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. दिवसभर पाऊस व गारवा असल्याने नागरिकांनी स्वेटर परिधान केले. शहरातून तुळजापूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीमिश्रित मुरूम टाकला आहे. रविवारच्या पावसाने खड्डय़ांत पाणी साचले. त्यामुळे रस्ता चिखलमय होऊन दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरला. तीनचाकी, चारचाकी वाहनचालकांना रस्त्यावरील खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून आले.