सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पावसाचे उशिरा आगमन होऊनही छानदार सलामी मिळाली, पण सध्या पावसाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती आहे. भरडी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना लावणीसाठी पाणी नसल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासाच्या पावसाची माहिती मिळाली असता मालवणात पाऊसच कोसळत नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आठ तालुके आहेत, त्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली व वैभवावाडी हे पाच तालुके सह्य़ाद्रीच्या तर देवगड, मालवण व वेंगुर्ले हे तालुके सागरी किनारपट्टीलगतचे आहेत. जिल्ह्य़ाची भौगोलिक परिस्थिती पाहता कोसळलेला पावसाने पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते.
जिल्ह्य़ात गेल्या २४ तासात १३०.२० मि.मी. एवढा पाऊस कोसळला आहे. मालवणमध्ये पावसाची नोंदच नाही. मालवणवगळता सातही तालुक्यात सरासरी १७.२८ एवढी नोंद आहे. हा पाऊस आठही तालुक्यात समान कोसळत नाही. पाणलोट क्षेत्र आणि भरडी क्षेत्र अशा दोन प्रकारच्या क्षेत्रात भातशेती पीक घेतले जाते.
या हंगामात १ जूनपासून आतापर्यंत सर्वात जास्त कणकवली तालुक्यात १०९२ मि.मी. एवढा पाऊस नोंदला गेला आहे. त्यानंतर दोडामार्ग ८४४ मि.मी.; सावंतवाडी ९१४ मि.मी.; वेंगुर्ले ६९९.२०मि.मी.; कुडाळ ६८० मि.मी.; मालवण ७३४ मि.मी.; देवगड ६८४ मि.मी. तर वैभववाडीत ९३३ मि.मी. एवढा पाऊस महिनाभरात कोसळला आहे.
अवकाळी पाऊस यंदा सुरू झाला. त्यानंतर हंगामाच्या सुरुवातीला हंगामी पावसाचे आगमन झाले. किमान पंधरवडाभर पाऊस उत्तम होता, पण गेले काही दिवस पावसाने उघडीप साधली आहे. त्यामुळे भातरोपे लावणीचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे. ग्रामीण भागात पाणथळ जागा आहे तेथे रोपे काढून लावणी केली जात आहे.
जिल्ह्य़ात आठही तालुक्यात पावसाचे व लावणीचे वेळापत्रक मागेपुढे आहे. त्यामुळे भातशेतीच्या लावणीला पावसाचा थोडा अडसर होणार आहे. मात्र पाणलोट भागासाठी हा पाऊस उत्तम आहे असे कृषी विभागाने सांगितले.
जिल्हाभरात पावसाने उघडीप साधली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होत आहे. या आठवडय़ात पावसाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला वेगाने प्रारंभ केला आहे.