नाशिक जिल्ह्यातील उत्तर व पूर्व भागातील अवकाळी पाऊस आता अन्य जिल्ह्याकडे सरकत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अवकाळी पावसाने रविवारी नाशिक जिल्हातील पिकाचे नुकसान केले. त्यानंतर आता ठाणे, रायगड, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान अंदाज क्षेत्रातील एका खासगी संस्थेने वर्तविला आहे. सोमवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यासह ठाणे, रायगड, पुणे, आणि अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी, निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, पुण्यातील जुन्नर आणि अहमदनगरमधील संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर या भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नाशिक जिल्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नाशिकमध्ये आज अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले.त्यामुळे विविध कारणांनी त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. उन्हाच्या रखरखीने त्रस्त झाल्यामुळे नाशिक शहरातील नागरिक या पावसाने सुखावला असला तरी शेतकऱ्याच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. त्यात आता ठाणे, रायगड, पुणे आणि अहमदनगरमधील चार जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाचे संकेतामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर संकटाचे ढग दाटून आले आहेत.