शिवसेनेतूनच बाहेर पडलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधी निवडणुकांवेळी आणि इतर विविध घटनांवेळी शिवसेनेवर कायम तोफ डागली. जाहीर सभांमधून त्याचबरोबर पत्रकार परिषदांमधून त्यांनी शिवसेनेला फटकारले. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीवेळीही राज ठाकरे यांनी फक्त शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात मनसेचे उमेदवार उभे केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
बाळासाहेब ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांना वडापाव देण्यात येत होते, मात्र मी त्यांना घरातून चिकन सुप दिल्याचे विधान राज ठाकरे यांनी खुल्या व्यासपीठावरुन केले होते. त्यांच्या या विधानाचा मोठे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणा उमटले. अनेकांनी राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर नाराजीही व्यक्त केली होती.
भाजप आणि शिवसेना सध्या राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहेत. मात्र, दोन्ही पक्षांमधील मतभेद जगजाहीर आहेत. भाजप शिवसेनेच्या या वादावर देखील राज ठाकरे यांनी शिवसेनेला धारेवर धरले. भाजप तुमच्यासह सत्तेत आहे आणि तो जर तुमचे ऐकत नसेल तर मग सत्तेत राहता कशाला, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
मराठीचे राजकारण करणाऱ्या मनसेने गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर पाडवा मेळावा घेतला. शिवाजी पार्कवरील मनसेचा हा पहिला सांस्कृतिक कार्यक्रम होता. यावेळी महापालिकेने मनसेच्या सभेला परवानगी दिल्यानंतर काहींच्या पोटात दुखायला लागले, असा टोला मनसेकडून शिवसेनेला लगावण्यात आला होता.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रचार सभेमध्ये शिवसेना डरपोकांचा पक्ष आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.
जैतापूर आंदोलनाचे काय झाले?, असा खोचक सवाल करत सत्तेत राहून विरोध करण्याचे शिवसेना नाटक करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली होती.
मुंबईमध्ये सुरु असणाऱ्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या भूमिकेबाबत देखील राज ठाकरे यांनी शिवसेनेवर तोफ डागली होती. मुंबईतील अनधिकृत इमारती अधिकृत करता, पण बिल्डरवर कारवाई का नाही? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला होता.