गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी मिळावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असून आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याने आत्महत्या करू नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करूनही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनी अखेर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुई परिसरात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या द्राक्षबागांची रविवारी राज ठाकरे यांनी पाहणी केली. राज यांचा हा पाहणी दौरा सुरू असतानाच नुकसानग्रस्तांचे पीक कर्ज माफ करावे व नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी सरपंच कैलास तासकर यांच्यासह काही शेतकऱ्यांनी ‘गाव बंद’ची हाक दिली. गावात तीन ठिकाणी सरण रचून सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला. तहसीलदार संदीप आहेर, नायब तहसीलदार साहेबराव सोनवणे आदींनी शासनाकडे मागण्यांसंदर्भात पाठपुरावा केला जाईल, असे सांगत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.  दरम्यान, नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी रुई, धारणगाव, देवगाव या परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. दगू गायकवाड, पोपट तासकर यांसह इतरही काही शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांमध्ये जाऊन त्यांनी नुकसानीचा अंदाज घेतला. यावेळी त्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे योग्य तऱ्हेने होत आहेत की नाही हे पाहण्याचे काम मनसेचे कार्यकर्ते करतील. नुकसानग्रस्तांचे कर्ज संपूर्णपणे माफ करण्यात यावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तरीही शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे न घेता मुख्यमंत्री येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. दिंडोरी आणि चांदवड दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी ओझर विमानतळावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीव्दारे आंदोलकांशी संपर्क साधला. विधिमंडळात नुकसानग्रस्तांसाठी सोमवारी मदत जाहीर करण्यात येणार असल्याने आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच तुमचा विश्वास बसण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना रुई येथे पाठवीत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी विलास पाटील हे सायंकाळी सातच्या सुमारास रुई येथे दाखल झाले. त्यानंतर सुमारे सात तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. द्राक्ष, कांदा, मका व गहू पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊनही नुकसानीचे पंचनामे व पाहणी करण्यासाठी निफाडचे तहसीलदार, कृषी अधिकारी न फिरकल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी रुई येथील मनोऱ्यावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. तब्बल पाच तासांनंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर रविवारी सकाळपासून रुई गाव बंद ठेवून सरणावर बसून सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता.