नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज भेट घेणार आहेत. सकाळी साडेदहाच्या सुमारास ते भेट घेणार असल्याचे समजते आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. तसेच या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करू असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना दिले होते. या भेटीच्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुतेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कोपर्डी दौ-याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. तसेच या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशीही कोणत्याही प्रकराचा संवाद साधला नव्हता.
यापूर्वी केंद्रातील सामाजिक न्याय खात्याचे मंत्री रामदास आठवले देखील पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी कोपर्डी येथे जाणार होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी आठवले यांना कोपर्डीला न जाण्याच्या सूचना केल्या होता. तेथली परिस्थिती तणावपूर्ण आहेत तेव्हा कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगत आठवले यांना माघारी फिरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे पीडित कुटुंबीयांची भेट न घेताच आठवले यांना विमानतळावरून परतावे लागले होते.
याआधी भारिप-बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी नगरकडे रवाना झाले होते. त्यावेळी त्यांची गाडी शिरूरजवळ अडवत त्यांना नगर पोलिसांनी सीआरपीसी कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव तिथे न जाण्याच्या सूचना देखील त्यांना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रकाश आंबडेकर यांना देखील पीडित कुटुंबियांची भेट न घेताच परतावे लागले होते.