केवळ आपला प्रभाग नव्हे, तर संपूर्ण शहर हे विकासाच्या दृष्टीने केंद्रीभूत धरून काम करण्याचे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवकांना केले.
महापालिका प्रभाग समिती सभापतीपदांच्या निवडणुकीनंतर शहरात दाखल झालेल्या राज यांनी रविवारी विश्रामगृहात आयोजित बैठकीत पक्षाच्या नगरसेवकांना मार्गदर्शन केले. दुपारपासून ताटकळणाऱ्या नगरसेवकांना राज यांनी सायंकाळी दर्शन दिले. तत्पूर्वी नगरसेवकांचे म्हणणे बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांनी जाणून घेतले. यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये कोणती कामे करण्यात आली आणि कोणती कामे आवश्यक आहेत, याविषयी माहिती दिली. राज यांनी नगरसेवकांना केवळ आपल्या प्रभागापुरता विचार न करता विकासकामांसाठी संपूर्ण शहर हे लक्ष्य ठेवण्यास सांगितले. कोणत्या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे, उर्वरित कार्यकालात नाशिक शहराचा अधिकाधिक विकास करण्यासाठी काय करता येणे शक्य आहे, याविषयी त्यांनी निर्देश दिले. राज यांचे विश्रामगृहात आगमन झाल्यावर जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे यांनी त्यांचे स्वागत केले. पश्चिम प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत पक्षाने ठरविल्यानुसार मतदान न केल्याने चर्चेत राहिलेले माजी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांची अनुपस्थिती यावेळी चर्चेचा विषय ठरली.