देवस्थान व आजूबाजूच्या परिसराचा विकास झाल्यानंतर देवस्थानांकडील संपत्ती देशाच्या विकासासाठी उपयोगी पडली तर चांगलीच गोष्ट आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील देवस्थानांकडे असलेले सोने बँकांमध्ये ठेवण्याच्या केलेल्या आवाहनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबाच दिला.

राज ठाकरे यांनी आज, रविवारी परिवारासह शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजपर्यंतची कारकीर्द चांगली आहे. पण त्यांच्याकडून लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या, ‘अच्छे दिन आने वाले है’ असे काही दिसत नसल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले की, माझे नाही तर राजकीय विश्लेषक, अर्थतज्ञ व जाणकारांचे मत आहे. शिर्डी देवस्थान व परिसराचा विकास करण्यास संस्थान तसेच राज्य सरकार अपयशी ठरले. या संस्थानचा ज्या पध्दतीने विकास व्हायला पाहिजे होता तसा झालेला दिसत नाही. खरे तर शिर्डी संस्थान तिरूपती देवस्थानकडे चालविण्यास द्यायला पाहिजे. त्यांनी ज्या पध्दतीने संस्थान व परिसराचा विकास केला अशी कोणतीही बाब येथे दिसत नाही. कुंभमेळा (सिंहस्थ पर्वणी) १२ वर्षांतून एकदाच येतो, संस्थान मात्र कायम आहे. अनेक वर्षांंपासून येथील प्रश्न तेच आहेत. विदेशातून तसेच देशभरातून भक्त मोठय़ा प्रमाणावर येतात. त्यांना साध्या पायाभूत सुविधाही मिळत नाहीत. येथे विकास करायचा असेल तर हे संस्थानचे काम नाही. राज्य सरकारने यात लक्ष घातले पाहिजे. त्यासाठी येथे विकास आराखडा बनवून तो राबविण्यासाठी प्राधिकरणाची गरज आहे. वैष्णव देवी, तिरूपती देवस्थान यांनी ज्या पध्दतीने व्यवस्थापन केले तसे शिर्डीत होणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांना व व्यावसायिकांना विश्वासात घेवून तेथील विकास कामे दाखविली पाहिजे.

साईबाबांवरील श्रध्देतून संस्थानच्या विश्वस्त (ट्रस्ट) मंडळावर येण्यासाठी धडपड करायची आणि येथे आल्यावर पैसे खायचे हे योग्य नाही..! लाखो लोक श्रध्देने पैसे टाकतात, मात्र विश्वस्त पैसे खाणारे असतील तर संस्थानची कधीच प्रगती होणार नाही. येथील लोकांना व व्यावसायिकांना विश्वासात घेवून विकास करणे शक्य आहे. परंतु ज्याला हवे तो ते करत गेल्याने काहीच आकार राहिलेला नसल्याची टीका त्यांनी केली.
नियोजनबध्द विकासासाठी नाशिक महानगरपालिकेने जेवढी अतिक्रमणे काढली तेवढी अन्य कुठेही काढली नाही. ज्यांच्याकडे २० ते २५ वर्षे सत्ता होती, त्यांचा विकास आणि आमचा विकास पहा आंम्हाला तर तीनच वर्षे झालीत, आम्ही करतो ते बघायचे नाही आणि छापायचे सुध्दा नाही..! असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे यांच्या समवेत मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी, मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर आदी होते.

पश्चिमद्वार बंद का
श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरातील पश्चिम बाजूचे प्रवेशद्वार अत्यंत सुयोग्य असतांना ते बंद का केले याची विचारणा करत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. शिर्डी येथे नगरपालिका आहे का, सत्ता कुणाची आहे, याची त्यांनी चौकशी केली व उत्तरे ऐकून आश्चर्य व्यक्त केले.