विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पवार काका-पुतण्यास हद्दपार करण्याची भाषा करणारे नरेंद्र मोदी आता शरद पवार हे आपले राजकीय सल्लागार असल्याचे म्हणतात. काय चाललंय काहीच कळत नाही..सत्तेत कोण आणि विरोधात कोण, काहीच कळत नाही..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र राज्य कामगार आघाडीच्या राज्यव्यापी अधिवेधनात मार्गदर्शन करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील एकंदर राजकीय परिस्थितीचा ‘काळीच कळत नाही’ अशा उपहासात्मक पध्दतीने परामर्श घेतला.
 नाशिकरोड परिसरातील शिवाजीनगरमध्ये आयोजित या अधिवेशनात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील सत्ताधारी युतीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच बारामती दौऱ्यात केलेल्या वक्तव्याची नोंद घेत ठाकरे यांनी हेच मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पवार काका, पुतण्यास राजकारणातून हद्दपार करावयास सांगत होते, याची आठवण करून दिली. तेच आता शरद पवार हे आपले राजकीय सल्लागार असल्याचे सांगतात. त्यामुळे काय चाललंय काहीच कळत नाही. नाशिक महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेला पाठिंबा दिल्यावर मग  बोंबाबोंब कशाला केली होती, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांसाठी उपयुक्त परिस्थिती आहे. परंतु, विदर्भात टंचाईची परिस्थिती असताना तेथे साखर कारखान्यांना परवानगी दिली जाते, याबद्दल नाराजी व्यक्त केली.
सत्तेत एकत्र असणाऱ्या शिवसेना-भाजपच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याच्या भूमिकेवर ठाकरे यांनी कोण सत्तेत आणि विरोधात आहे, तेच कळत नाही, असे टीकास्त्र सोडले. सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस हेही स्वतंत्रपणे निर्णय घेण्याऐवजी दिल्लीहून मोदी-शहा यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणेच काम करत असल्याचा टोमणाही ठाकरे यांनी मारला. वीज कामगाराना सतत संपाचे हत्यार उचलणे योग्य नाही. त्यामुळे कामगारांचेच नुकसान होत असल्याचा सल्लाही दिला.