मला कोणाशी युती करायची इच्छा नाही, या एका वाक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्या ‘टाळी’ला टोला लगावला. त्याचवेळी महाराष्ट्र काबीज करण्यासाठीच मी हा दौऱा काढला असल्याचे सांगून पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशाही स्पष्ट केली.
महाराष्ट्राच्या दौऱयावर असलेल्या राज ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूरात पहिली जाहीर सभा घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र येणार का, या प्रश्नावर मला आणि राज यांना समोरासमोर बसवून हा प्रश्न विचारा, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत दिले होते. त्यांच्या या उत्तरावर राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. कोल्हापूरमधील सभेत राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा इरादा नसल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्राची लोकसंख्या दहा ते सव्वा दहा कोटी आहे. त्यामध्ये सर्वाधिक लोकं मराठी आहेत. इथे कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष आणि इतर अनेक पक्ष आहेत. या सगळ्या पक्षांना मराठी लोकचं मतं देतात. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतं दिली, तर मराठी मतं फुटली ही कोणती पद्धत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुद्दामहून मराठी लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे. माझ्यावर सध्या ८९ खटले आहेत. शंभरीसाठी अकरा खटले कमी आहेत. पण मी खटल्यांना भीक घालत नाही. माझे तोंड कधीच थांबणार नाही. मराठी माणसाच्या हितासाठी कायम बोलतच राहणार, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
प्रतिभाताई म्हणजे केवळ पदर टेरेसा
दौऱयाची सुरुवात झकास झाली, असे सांगत राज ठाकरे यांनी अफजल गुरुच्या फाशीच्या मुद्दयाला हात घातला. अफजलच्या फाशीचे स्वागत करताना ती द्यायला इतका उशीर का लागला, असा प्रश्न मांडत त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना लक्ष्य केले. मराठी राष्ट्रपतींनी अफजलला फाशी देण्याचा आदेश दिला असता, तर बरं वाटलं असतं. मात्र, प्रतिभाताईंची पाच वर्षे कशी गेली कळले नाही. प्रतिभाताई पाटील म्हणजे केवळ पदर टेरेसा असल्याची टीका त्यांनी केली.
… तर परप्रांतीयांचे हात कलम करा
परप्रांतातून सर्वाधिक १७ रेल्वेगाड्या महाराष्ट्रात येतात. राज्य सरकारला इथल्या लोकांपेक्षा परप्रांतीयांचीच जास्त चिंता आहे. परप्रांतीय इथल्या महिलांवर अत्याचार करताहेत. त्याबद्दल वर्तमानपत्रातून छापून येते. परप्रांतीयांनी इथल्या महिलांवर हात टाकला, तर त्यांचा हात कलम करा. सरकार लेचंपेचं आहे. त्यामुळेच परप्रांतीय असे करू शकतात. गुजरातमध्ये ते असं करू शकतील का, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी मोदी सरकारचे अप्रत्यक्षपणे कौतुक केले.
पश्चिम महाराष्ट्रातील संस्थानिकांना गाडून टाका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा काढताना गृहमंत्री आर. आर. पाटील आमच्या लोकांना धमकावत आहेत. यापुढे आमच्या लोकांना धमकावले, तरी पाटील यांच्या घरच्यांनाही आमच्याकडून धमकीचे फोन जातील, असा इशारा त्यांनी दिला. यापुढे पश्चिम महाराष्ट्राचे चित्र वेगळं दिसले पाहिजे. तुमच्यातील चेहरे उद्याचे आमदार आणि खासदार बनले पाहिजेत. इथल्या संस्थानिकांना इथेच गाडून टाका, अशी विनंतीही राज ठाकरे यांनी उपस्थितांना केली.
निवडणुकीचा निधी जमविण्यासाठी टोल लादलेत
मंत्र्यांना निवडणुकीचा निधी देण्यासाठीच मराठी माणसावर टोल लादले गेले आहेत, असा आरोप करीत त्यांनी टोल भरून रस्ते चकाचक झाले, तर काही हरकत नाही. मात्र, त्यातून मंत्र्यांची घरे आणि फार्म हाऊस चकाचक होणार असतील, तर काही उपयोग नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील महिन्यात याप्रकरणी कोर्टात जाणार आहे, असे सांगितले.