राज्याचे साहेब होण्याचे स्वप्न पाहात असाल तर मराठा समाजाला दूर ठेवून स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही, असा इशारा देत छावा संघटना व मराठा आरक्षण समितीतर्फे येथे सोमवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
राज ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यांतर्गत रविवारी जळगाव येथे झालेल्या सभेत मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला होता. मराठा आरक्षणाबाबत राज यांच्या वक्तव्यास मराठा आरक्षण समिती व छावा संघटनेने आक्षेप घेतला आहे. राज यांच्या भूमिकेविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत स्वस्तिक चौकात राज यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख नाना कदम, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष भोला वाघ, जिल्हा सचिव अर्जुन पाटील, राजेश पवार आदी या वेळी उपस्थित होते. मराठा समाजाचा आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. समाजाची एकूणच स्थिती वाईट झाली आहे. पुढारलेल्या मूठभर समाजाकडे न पाहता राज ठाकरेंनी ९० टक्के मराठा समाजाच्या अवस्थेकडे लक्ष घातले तर त्यांना सत्यता कळेल, असे निवेदनात म्हटले आहे. समाजाच्या भल्यासाठी युवकांनी आरक्षण लढय़ात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.