राज्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाईमुळे शेतकऱ्यांकडे असलेले पशुधन संकटात सापडले आहे. चाऱ्याअभावी जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शहरातील सूर्यवंशी कुटुंबीयांनीही केवळ नाइलाज म्हणून ऐटबाज अशा ‘राजा’ अश्वाची विक्री केली. या अश्वाला निरोप देताना कुटुंबातील सर्वच सदस्यांना गहिवरून आले. अशोक सूर्यवंशी परिवार ८० ते ९० वर्षांपासून अश्व पालनाचा व्यवसाय करतात. शहरातील विवाह समारंभांच्या वरातीमध्ये राजा अश्व हे खास आकर्षण असते. परंतु सध्या चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने सूर्यवंशी यांच्यावर राजा अश्व विक्रीची वेळ आली. शिर्डी येथील व्यापाऱ्याला अवघ्या २५ हजार रुपयांना त्यांनी अश्वाची विक्री केली. टंचाईची झळ सर्वानाच बसत आहे.
ग्रामीण भागात पाणी आणि चारा टंचाईमुळे पशुधन पाळणे जिकीरीचे झाले आहे. राजाला निरोप देताना शिवाजी चौकातील प्रत्येकाला अश्रू आवरणे कठीण झाले होते.