जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अंतिम टप्प्यात असतानाच माजी आमदार तथा बँकेचे संचालक राजीव राजळे यांनी त्यांचे मामा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे अशा सर्वावरच जोरदार टीका करीत या निवडणुकीत स्वत:चे असे सात उमेदवारही जाहीर केले. यातील चौघे राषट्रवादी-थोरात गटाचे तर तिघे विखे गटाचे आहेत.
जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजळे यांनी रविवारी रात्री पाथर्डी येथे आभार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात त्यांनी भाजपसह सर्वच पक्ष व जिल्हय़ातील नेत्यांवरही टीका केली. बँकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी-थोरात व विखे गट-भाजप-शिवसेना या दोन्ही मंडळांशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करून आहे त्या उमेदवारांमधूनच सात जणांना पाठिंबा देत हे सातही उमेदवार राजीव राजळे मित्रमंडळाचे उमेदवार आहेत, असे त्यांनी जाहीर केले. राजळे यांनी या मेळाव्यात त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्यासह राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार शिवाजी कर्डिले अशा सर्वावरच थेट टीका केली.
बँकेच्या निवडणुकीत आता एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. बँक दिवाळखोरीत गेली तर आमच्या मालमत्तेवर टाच आणण्याबाबतचे हे प्रतिज्ञापत्र आहे. त्याला घाबरूनच थोरात व विखे हे दोन्ही माजी बँकेच्या निवडणुकीपासून स्वत: दूर राहिले आहेत, असा आरोप राजळे यांनी केला. ते म्हणाले, बँकेत गेली पाच-सात वर्षे थोरात यांची सत्ता आहे. मात्र या काळात कधीही ते बँकेत फिरकले नाहीत. बँक कोण चालवत होते, हे सभासदांनी लक्षात घेतले पाहिजे. कोटय़वधींच्या आलिशान मोटारी वापरणारे बँक चालवू लागले आहेत. शेतकऱ्यांची बँक त्यांच्या ताब्यात द्यायची का, याचा सभासदांनी गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन राजळे यांनी केले.
भाऊसाहेब थोरात, शंकरराव काळे यांची ही बँक आता राहिली नाही, अशी टीका राजळे यांनी केली. ते म्हणाले, बँकेत शेतकऱ्यांच्या कोटय़वधी रुपयांच्या ठेवी आहेत. रात्रीतून मोलमोटारी आणून ही मंडळी या ठेवी घेऊन जाण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत. बँकेच्या निवडणुकीबाबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हय़ातील नेते दिशाभूल करीत आहेत. बँकेच्या बाबतीत पक्षश्रेष्ठींनी कोणताही आदेश दिलेला नाही. याबाबत आपली वरिष्ठांशी चर्चाही झाली आहे. अर्बन बँकेचा ज्यांनी खुळखुळा वाजवला, त्यांना जिल्हा बँकेबाबत बोलण्याचा अधिकार नाही. आमदार कर्डिले यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी आत्तापर्यंत चार अधिकाऱ्यांना बंदूक लावल्याचा आरोप राजळे यांनी केला. पाचपुते यांचा खोटे बोलणे हा धंदा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपल्याला फसवले, असे ते म्हणाले.
राजळेंची शिफारस
राजळे यांनी या निवडणुकीत ७ उमेदवारांची शिफारस केली आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत. रावसाहेब शेळके (शेतीपूरक संस्था  मतदारसंघ), मीनाक्षी साळुंके (महिला), वैभव पिचड (अनुसूचित जाती-जमाती) आणि बाजीराव खेमनर (भटक्या विमुक्त जमाती, चौघे राष्ट्रवादी-थोरात गट). सबाजी गायकवाड (बिगरशेती संस्था मतदारसंघ), प्रियंका शिंदे (महिला) आणि सुरेश करपे (ओबीसी मतदारसंघ, तिघेही विखे गट).