८ लाखांचे नुकसान

तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील दोन दुकानांना बुधवारी दुपारी ११.३० वा.च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेमध्ये लोकांची चांगलीच गर्दी होती. मात्र, अचानक लागलेल्या आगीने लोकांची चांगलीच धावपळ उडाली. यामध्ये अनेकांनी पाण्याचा मार करून दुकानांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, या आगीच्या घटनेमध्ये सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी, शॉटसर्कीटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पाचल बाजारपेठेतील राजन लब्धे आणि प्रसाद पाथरे यांच्या दुकानाच्या येथून धूर येत असल्याचे काही लोकांच्या लक्षात आले. काही वेळातच धूराचे आगीमध्ये रूपांतर झाले. त्यामुळे साऱ्यांनीच या दुकानांच्या दिशेने धाव घेतली. मात्र, कामामध्ये गढून असलेल्या या दुकानांच्या मालकांसह कामगारांना याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्या ठिकाणी गेलेल्या लोकांनी त्याबाबतची माहिती दिली. आणि साऱ्यांचीच धावपळ उडाली. त्यानंतर, बाजारपेठेमध्ये आलेले लोक, दुकानातील कामगार, बाजारपेठेतील व्यापारी यांनी आग विझविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले. मात्र, दुकानांमध्ये स्टेशनरीसह फटाक्यांचा माल असल्याने आग चांगलीच भडकली. त्यामुळे पाणी मारून आग विझविण्याच्या लोकांच्या प्रयत्नांना यश न येता ती चांगलीच भडकली होती. या दोन दुकानांना लागलेल्या आगीची झळ बसून शेजारच्या दुकानांना आग लागण्याच्या भितीने त्या दुकानदारांनी आपल्या दुकानातील माळ अन्यत्र तातडीने हलवून आपल्या दुकानाला आग लागणार नाही याची खबरदारी घेतली. दरम्यान, या घटनेची माहिती राजापूर तहसिलदार कार्यालयासह पोलिसांना देण्यात आली. त्यांनी नगर पालिका प्रशासनाशी संपर्क साधून पालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी पाठविला. या बंबाच्या सहाय्याने पाण्याचा फवारा मारण्यात आला. त्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत आगीने आपले काम चोख बजावले होते. दरम्यान, या आगीच्या घटनेमध्ये सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीचा पंचनामा महसूल प्रशासनाकडून सुरू होता.