राजर्षी शाहू मेमोरिअल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, २५ जून शाहू जयंतीदिनी (सोमवारी) श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. राज्यमहसूल आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. जिल्हाधिकारी ट्रस्टचे अध्यक्ष विज्ञान क्षेत्रातील असामान्य कामगिरी आणि राजर्षी शाहूमहाराज यांच्या विचारांचा कृतिशील वारसा चालू ठेवणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून माशेलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मश्री आणि पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे यापूर्वी त्यांना पन्नासहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण तसेच शांतीस्वरूप भटनागर मेडल, मटेरिअल सायंटिस्ट ऑफ दी इयर, पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी ग्लोबल अॅवॉर्ड हे त्यांपैकी काही आहेत.