राज्य मंत्रिमंडळ आणि विधानपरिषद या दोन्हीकडून डावलले गेल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व मंत्रीपदाचे वेध लागलेले प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दोन दिवसापूर्वी भाजपावर आगपाखड केली होती. पण शुक्रवारी खासदार शेट्टी यांनी या मुद्यावर ‘यू टर्न’ घेतला असून या प्रश्नावर आपणासह पक्षास काहीही बोलायचे नाही, असे म्हणत बंडाची तलवार म्यान केली. तर, ‘एफआरपी’प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पसे न मिळाल्यास २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्याला घेरावो घालण्याचे आंदोलन मागे घेत असल्याचे स्पष्ट करताना पुन्हा एकदा ३१ जानेवारीची मुदत शासन व साखर कारखान्यांना शेट्टी यांनी दिली आहे. या अवधीत हंगाम सुरू होण्याच्या काळातील ऊस तोडीची एफआरपीप्रमाणे रक्कम न मिळाल्यास २ फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा पत्रकारांशी बोलताना केली.
उसाला एफआरपीप्रमाणे बिले मिळावित यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवड्यापासून आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. पुण्यातील साखर संकुलाची मोडतोड स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतरही ऊस उत्पादन शेतकऱ्याचे आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. जिल्हा नियोजन मंडळाच्या बठकीसाठी उपस्थिती लावलेल्या खासदार शेट्टी यांना ऊस आंदोलन प्रश्नी बोलते केले. या वेळी ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनी सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना स्वाभिमानीच्यावतीने घेरावो घालण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेवून साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू केली आहे. जिल्हानिहाय साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी बोलावून घेऊन नोटिसा दिल्या जात आहेत. एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना बिले न दिल्यास गोदामातील साखर जप्त करण्याची कारवाई महसुली थकीत कलमान्वये केली जाणार आहे. ही प्रक्रिया शासनाने सुरू केली असून त्याबद्दल आपण समाधानी आहोत यामुळे २६ जानेवारीला पालकमंत्र्यांना घेरावो घालण्याऐवजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले देण्याबाबतची तीव्रता निदर्शनास आणून देणारे निवेदन स्वाभिमानीच्या वतीने दिले जाणार आहे. तथापी ३१ जानेवारीपर्यंत किमान नोव्हेंबर महिन्यातील ऊस तोडीचे बिले न दिल्यास २ फेब्रुवारीपासून आंदोलन करण्यात येणार आहे, असे शेट्टी म्हणाले.
‘कारखानदार पोपटासारखे बोलतील’
साखर कारखान्याच्या गोदामातील साखर सील करण्याच्या कारवाईमुळे नेमका काय फरक पडणार आहे, या प्रश्नांवर बोलताना खासदार शेट्टी म्हणाले,की गोदामातील साखर जप्त होण्याच्या कारवाईचे रहस्य केवळ साखर कारखानदारच जाणतात. त्यांना कारवाईच्या नोटिसा तर जाऊद्यात, ती पोहोचल्यावर ते पोपटासाखरे बोलायला लागतील, असे म्हणत शेट्टी यांनी कारवाईतील मर्मावर बोट ठेवले.