गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, क्रिमीलेअरसारखी जाचक अट रद्द करावी. बंजारा तांडय़ामध्ये पक्के रस्ते, पाणी, पक्की घरे व इतर मूलभूत सुविधा द्याव्यात, तसेच गोर बोलीला भाषेचा दर्जा मिळावा आदी मागण्यांसाठी पारंपरिक वेशभूषेत बंजारा समाजाने परभणीत मोर्चा काढला.
गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, शिवचरण महाराज अमरगड, गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष निलाकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. वसंतराव नाईक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन वसंतराव नाईक चौकातून सतगुरू सेवालाल महाराजांना शिवचरण बापू यांच्या हस्ते भोग लावून मोर्चा सुरू झाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. मोच्रेकऱ्यांनी घोषणाबाजीने शहर दणाणून सोडले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले.
प्रा. चव्हाण म्हणाले की, गोर समाज २९ राज्ये व ७ केंद्रशासीत प्रदेशांत वास्तव्यात आहे. स्वातंत्र्य मिळवून ६७ वष्रे झाली, तरी आजही हा समाज हलाखीचे जीवन जगत आहे. १९७०पासून गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आजही धूळखात पडून आहे. गोर समाजाला अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गात समाविष्ट केले आहे. परंतु आता त्याच प्रवर्गातून समाजाला काढण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप प्रा. चव्हाण यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.