नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या गप्पा हा निव्वळ लबाडपणा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक बाबतींत काँग्रेसची नक्कल केली. त्यामुळे हा लबाडपणा उघड झाल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची उद्या (गुरुवारी) सायंकाळी ५ वाजता येथे जाहीर सभा होणार आहे. या संदर्भात पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे आले होते. ते म्हणाले की, विदर्भातील १० जागांच्या निवडणुका झाल्यावर राज्यातील महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. विदर्भातील जनतेस देण्यासारखे काही नसेल अथवा तेथील विकासाबाबत महायुतीचा काही दृष्टिकोन नसेल म्हणून हा विलंब झाला असेल, असा टोला त्यांनी लगावला. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून विनायक मेटे महायुतीत गेले. परंतु त्या संदर्भात तेथील जाहीरनाम्यात काही स्पष्ट केले नाही. रिपाइं नेते रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठविले. परंतु मागासवर्गीयांच्या संदर्भातील उल्लेखही महायुतीच्या जाहीरनाम्यात नाही.
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी एकत्रितरीत्या निवडणूक लढवीत असून नेतेमंडळी एकमेकांच्या मतदारसंघातही प्रचार करीत आहेत. सिंधुदुर्गात आमदार केसरकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतली असली, तरी केसरकर म्हणजे पूर्ण राष्ट्रवादी नाही. त्यांची भूमिका काहीही असली, तरी तेथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करीत आहेत. चार-दोन कार्यकर्ते चुकीच्या मार्गाने गेले तर त्यामुळे फरक पडत नाही, असे ठाकरे म्हणाले.
मराठवाडय़ात काँग्रेसच्या किती जागा निवडून येतील, असा प्रश्न विचारला असता त्यांनी कोणताही निश्चित अंदाज व्यक्त केला नाही. उलट पत्रकारांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्हालाच अधिक माहीत असेल. तुम्हीच काँग्रेसच्या किती जागा येतील, हे सांगू शकता! मागील निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरले होते, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाढल्या होत्या. या वेळेसही मागच्यापेक्षा अधिक जागा येतील. येत्या २० एप्रिलला सोनिया गांधी नंदुरबार व मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. त्या दिवशी त्यांनी दुपारी मालेगाव येथे सभा घ्यावी, असा प्रयत्न चालू असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
माणिकरावांची टाळाटाळ!
जालना लोकसभा मतदारसंघात जालना व औरंगाबाद जिल्ह्य़ांतील प्रत्येकी तीन विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. परंतु जालन्यातील काँग्रेसवर नेहमीच औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे दडपण असते, असा आरोप काही कार्यकर्ते अधून-मधून करीत असतात. या पूर्वी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून जालन्यातील अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबुराव कुळकर्णी यांना जाहीर झालेली उमेदवारी काँग्रेसने ऐनवेळी नाकारून औरंगाबादचा उमेदवार दिला होता. या वेळी लोकसभेसाठी इच्छुक असलेले जालना जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांच्याऐवजी औरंगाबाद जिल्हाध्यक्षांचे पुत्र विलास औताडे यांना पक्षाने उमेदवारी दिली. या पाश्र्वभूमीवर जालना जिल्हा काँग्रेस औरंगाबादच्या अधिपत्याखाली आहे का, असा प्रश्न विचारला असता ठाकरे यांनी त्याबाबत काही बोलण्याचे टाळून सरळ विषयांतर केले. काँग्रेस कार्यकर्ते कसे एकदिलाने काम करीत आहेत, हे सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. आपण मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहात, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका ठाकरे यांनी कायम ठेवली.