रामदास आठवले यांची भूमिका
आपणास मंत्रिपदाची आवश्यकता नाही; परंतु देशभरातील आंबेडकरी जनतेला, कार्यकर्त्यांना मी मंत्री व्हावे असे वाटते. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री होते. त्याप्रमाणे मलाही मंत्री म्हणून पाहण्याची आंबेडकरी जनतेची इच्छा आहे, अशी भूमिका खा. रामदास आठवले यांनी मांडली.
शनिवारी येथील विश्रामगृहात आठवले यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. रिपाइंचे सर्व गट एकत्र आल्यावर युतीबरोबर राहावयाचे की अन्य पक्षात यासंदर्भात भूमिका ठरविता येईल. आम्ही सत्तेशिवाय जगू शकतो. आमचा कार्यकर्ताही सत्तेविना जगतो. आपण भाजप-सेना युतीबरोबर गेल्याने दलित समाजाची मते युतीला मिळाली. त्यामुळे ते सत्तेवर आले. शिवसेनेनेही बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवशक्ती-भीमशक्तीची हाक दिली होती. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत गेलो. याचा अर्थ आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारप्रणाली स्वीकारली असा होत नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले. भीम संदेश यात्रेनिमित्ताने आपण आतापर्यंत २९ राज्यांमध्ये जाऊन आलो असून यात्रेनिमित्ताने बाबासाहेबांच्या जन्मगावी महू येथे संविधान मंदिर उभारण्याची मागणी आपण सरकारकडे करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. धुळ्यात कृषी विद्यापीठ होण्यासंदर्भात वाद असेल तर दोन कृषी विद्यापीठ उभारावेत अशी आपली भूमिका राहणार आहे, असे आठवले म्हणाले.