विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी सतत कार्यरत राहण्याची ग्वाही येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अतिथिगृहात खा. रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजहिताचा विचार करूनच अहोरात्र परिश्रम घेऊन एक आदर्श विद्यार्थी म्हणून आपली प्रतिमा विश्वात निर्माण केली. कोलंबिया विद्यापीठातील वाचनालयात १८-१८ तास अभ्यास करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सतत प्रयत्नरत राहिले. याचाच एक भाग म्हणून जात तोडो समाज जोडो हे अभियान आम्ही राबवत असल्याचे आठवले यांनी सांगितले. या वेळी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम, कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन उपस्थित होते. विद्यार्थी हितासाठी शिष्यवृत्तीच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देण्याची सूचना कुलगुरूंनी आठवलेंना केली. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक खर्चाची तरतूद दर अर्थसंकल्पामध्ये वाढविण्याच्या मागणीचे निवेदन मागासवर्गीय संघटनेतर्फे राजू सोनवणे, अरुण सपकाळे, भीमराव तायडे, आर. टी. बाविस्कर आदींनी आठवले यांना दिले. प्रास्तविक प्रा. सत्यजित साळवे यांनी केले. आभार संदीप केदार यांनी मानले.