राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये एकाच प्रभागातून चार सदस्य तर नगरपरिषद निवडणुकांमध्ये एकाच प्रभागातून दोन सदस्य निवडून देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचा आक्षेप घेत त्याविरोधात खासदार रामदास आठवलेप्रणीत रिपाइं पक्षाच्या वतीने सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात शेकडो कार्यकत्रे सहभागी झाले होते.
महापालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क चौकात रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे व शहराध्यक्ष अरुण भालेराव यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. एका मोठय़ा प्रभागातून चार सदस्य निवडून देताना त्याचा सर्वाधिक फटका रिपाइंसारख्या छोटय़ा छोटय़ा पक्षांना बसणार आहे. नवबौद्ध व मुस्लीम समाजाचे नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका प्रभागातून चार सदस्य निवडून देण्याचा निर्माण शासनाने तत्काळ रद्द करावा, अशी मागणी राजा सरवदे यांनी या वेळी बोलताना केली. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले.