लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीत सामावून घेण्याची आवश्यकता नाही, असे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी येथे पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले.
भाजप नेते नितीन गडकरी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली बैठक ही महायुतीची अधिकृत बैठक नव्हती. गडकरी वैयक्तिक पातळीवर राज ठाकरे यांना भेटले. गडकरी यांचे म्हणणे राज ऐकतील, असे वाटत नाही. महायुतीत तिसरा भिडू नको, असे पूर्वी आपले मत होते. परंतु राजू शेट्टी व महादेव जानकर आल्यामुळे महायुती अधिक बळकट झाली आहे. आता जागावाटपही झाले आहे.
महायुतीत सातारा मतदारसंघ रिपाइंस सुटला असून, एक-दोन दिवसांत तेथील उमेदवार जाहीर करण्यात येईल. तो बहुजन समाजाचा असेल. पाच-सहा जण तेथून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आणखी एक जागा तरी रिपाइंस सुटावी, अशी अपेक्षा होती. वध्र्याची जागा मागितली होती व तेथील आमचा नियोजित उमेदवार कुणबी समाजाचा राहिला असता. रामटेकच्या जागेचाही विचार होता. परंतु महायुतीत नवीन दोन पक्ष आल्यामुळे या जागांचा विचार झाला नाही. राज्यात महायुतीच्या ३५-३६ जागा निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.
राज्य व केंद्रातील सत्तेत रिपाइंला योग्य स्थान मिळावे, अशी आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने रिपाइंस २५-२६ जागा सोडाव्यात, अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, रिपाइं मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांची उपस्थिती होती.