दापोलीत रामदास कदम, अनंत गीते यांच्यात दिलजमाई

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या विरोधात बंड करून त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले माजी तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे यांना पक्षाच्या दापोली तालुकाप्रमुखपदाची सूत्रे पुन्हा एकदा सोपवण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. यासाठी खुद्द पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी पुढाकार घेतला आहे. या राजकीय हालचालींमुळे दापोली शिवसेनेचे आतापर्यंतचे सर्वेसर्वा असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि त्यांच्या समर्थकांना जबरदस्त हादरा बसला आहे.

दरम्यान, दळवी यांच्या मुख्य प्रवाहातील राजकारणापासून दूर राहत स्वत:ला सहकार क्षेत्रापर्यंतच मर्यादित ठेवणारे दापोलीचे ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर कालेकर यांना उपजिल्हाप्रमुखपदावर बढती देण्याची प्रक्रियाही मातोश्रीवर सुरू आहे. या घडामोडींतून रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यातील मतभेद दूर झाल्याचे संकेत असले तरी ही तथाकथित ‘दिलजमाई’ राष्ट्रवादीचा दापोलीत उधळलेला वारू रोखण्यासाठीचीच तयारी असल्याचे मत राजकीय निरीक्षकांत व्यक्त होत आहे.

यावर्षी डिसेंबरमध्ये नगरपंचायत निवडणुका होणार असून त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम आक्रमक राजकारण करून विरोधी पक्षांतील अनेक नाराज नेत्यांना आपलेसे करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठीही त्यांची जोरदार तयारी सुरू झाल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे. राष्ट्रवादीच्या या प्रयत्नांना साहजिकच शिवसेनेतील गटबाजीच पोषक ठरली आहे.

या पाश्र्वभूमीवर नेत्यांमधील मतभेद संपुष्टात आणून मतदारसंघात पक्षाचे वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न थेट मातोश्रीवरून सुरू झाला आहे. मातोश्रीवरील अनंत गीते आणि रामदास कदम यांच्या हस्तांदोलनाचे सोशल माध्यमांवर फिरत असलेले छायाचित्र त्याचेच द्योतक आहे.

त्यातच माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे विरोधक असलेले प्रदीप सुर्वे यांची तालुकाप्रमुखपदासाठी आणि सुधीर कालेकर यांची उपजिल्हाप्रमुखपदासाठी या नेतेद्वयांनी केलेली शिफारस याच यशस्वी दिलजमाईचा भाग आहे.

मात्र या राजकीय घडामोडींतून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रामदास कदम यांच्याकडून चिरंजीव योगेश कदम यांच्यासाठी आतापासूनच मोच्रेबांधणी सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.