भाजपा-सेना युती तुटल्याच्या बातम्या विविध मीडियावरून पसरवल्या जात असल्या तरी त्या निखालस खोटय़ा असल्याचा निर्वाळा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी दिला.

चिपळूणमध्ये कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना कदम म्हणाले की, भाजप-सेना युती तुटण्याचा प्रश्न नसून सेनेच्या मंत्र्यांना राजीनामे देण्यासही सांगण्यात आलेले नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत योग्य वेळी निर्णय घेतील. भाजपचे मंत्री प्रकाश मेहता उद्धवजींना न भेटताच मातोश्रीवरून माघारी परतल्याची चर्चाही खोटी आहे. शिवसेनेचा जबाबदार नेता म्हणून आपण हे मत मांडत असल्याचेही कदम यांनी आवर्जून सांगितले.

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपने राजकारण करून सेनेला बाजूला ठेवल्याचा आरोप करून कदम म्हणाले की, एवढे होऊनही उद्धवजी काही बोलले नाहीत. उलट, शिवसेनेने या प्रकरणी राजकारण करत न बसता शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. बीड जिल्ह्य़ात सेनेतर्फे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना १ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. शिवसेना भाजपला कमी लेखत असल्याचे भाजपकडून पसरवले जात आहे. प्रत्यक्षात डॉ. आंबेडकर स्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपनेच सेनेला बाजूला ठेवण्याचे काम केले.

या सर्व घटनांमुळे शिवसैनिकांच्या भावना वेगळ्या असल्या तरी पक्षप्रमुख उद्धवजीच योग्य तो निर्णय घेतील, असे कदम यांनी नमूद केले.