विधानसभेच्या निवडणुकीत जिल्हय़ातील सर्वपक्षीय उमेदवारांनी ‘पेड न्यूज’चा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. याच कारणावरून दोघा उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खुलासा मागणाऱ्या नोटिसा बजावल्या आहेत, तर दोघा माजी मंत्र्यांसह आणखी पाच उमेदवारांना नोटिसा बजावण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष अनिल कवडे यांनी आज संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. पेड न्यूजमध्ये महिला उमेदवारही मागे नाहीत.
एकाच उमेदवाराशी संबंधित, एकाच आशयाचे वृत्त, शब्दाचाही फरक न करता अनेक वृत्तपत्रांत छापून आणण्याची किमया उमेदवार ‘पेड न्यूज’च्या माध्यमातून करू लागले आहेत. त्यामुळे नोटिसा पाठवण्याचा आदेश झालेल्यांमध्ये बहुतांशी अशाच उमेदवारांचा समावेश आहे.
माजी मंत्री व श्रीगोंद्यातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बबनराव पाचपुते व नगरमधील काँग्रेसचे उमेदवार सत्यजित तांबे या दोघांना दि. २६ सप्टेंबर रोजी एका सायंदैनिकात प्रसिद्ध झालेले वृत्त पेड न्यूज असल्याचे समितीचे प्राथमिक मत झाल्याने त्यासंदर्भात समितीच्या सूचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पूर्वीच नोटीस काढण्यात आल्याची माहिती समितीकडून मिळाली. या नोटिशीवर दोघाही उमेदवारांनी खुलासा पाठवला आहे. मात्र या दोन्ही प्रकरणांत अद्यापि अंतिम बैठक होऊन निर्णय झालेला नाही.
याशिवाय राहुरीतील शिवसेनेच्या उमेदवार डॉ. उषा तनपुरे, कोपरगावच्या भाजपच्या उमेदवार स्नेहलता बिपीन कोल्हे, अकोल्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी मंत्री मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड, माजी मंत्री व शिर्डीतील काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण विखे, भाजपचे राहुरीतील उमेदवार शिवाजी कर्डिले, श्रीगोंद्यातील उमेदवार पाचपुते या सहा उमेदवारांना ९ प्रकरणांतील वृत्त पेड न्यूज असल्याचे समितीचे प्राथमिक मत झाल्याने नोटिसा बजावण्याचे आदेश झाले आहेत. या नोटिशींना उमेदवारांनी ४८ तासांत म्हणणे सादर करायचे आहे.
उमेदवाराने खुलासा केल्यानंतर त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वयंस्पष्ट अहवाल पाठवायचा आहे. त्यानंतर समितीची प्रकरणानुसार पुन्हा बैठक होऊन संबंधित बातमीला जाहिरातीचा दर लागू करून ती उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट करायची की नाही, याचा निर्णय होणार असल्याचे समितीच्या सदस्य सचिवांकडून सांगण्यात आले. ही सर्व पेड न्यूजची प्रकरणे सात वृत्तपत्रांमधील (‘लोकसत्ता’ नव्हे!) आहेत.