राहुरी तालुक्यात वाळूतस्करांनी उच्छाद मांडला असून मुळा नदीपात्रात वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला तस्करांनी परतवून लावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १० लाख रुपयांचा वाळूसाठा जप्त केला. तर प्रवरा नदीपात्रात वाळू ठेकेदाराच्या गुंडांनी केसापूरच्या गावकऱ्यांवरच हल्ला केला. वाळूतस्करांवर राहुरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सोमवारी सायंकाळी प्रांताधिकारी प्रकाश थवील, तहसीलदार राजश्री अहिरराव यांचे पथक नदीपात्रात गेले असता त्यांना वाळूतस्करांनी बळाचा वापर करून परतवून लावले. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी प्रांताधिकारी थवील, तहसीलदार अहिरराव, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा राहुरी बुद्रुक परिसरात गेला. त्यांनी ४६२ ब्रास वाळूसाठा जप्त केला. सुमारे १० लाख रुपयांचा हा साठा आहे. बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या ४ मालमोटारी व २ ट्रॅक्टरही ताब्यात घेतले. कामगार तलाठी शिवाजी टेमकर यांनी फिर्याद दाखल केली असून संजय परसराम माळी, श्याम रामदास माळी, अनिल रामदास माळी, सुनील साहेबराव माळी, सुभाष साहेबराव माळी, गौतम साहेबराव माळी, किशोर साहेबराव माळी यांच्याविरुद्ध चोरीचे गुन्हे नोंदवले आहेत.
नगर-मनमाड रस्त्यावर एमएच १७ के ८६५४ या क्रमांकाची मालमोटार चोरीच्या वाळूची वाहतूक करीत असताना पकडण्यात आली. पोलीस कर्मचारी संतोष नेहूल यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून, िपपळगाव फुणगी येथे गोरक्षनाथ रावसाहेब वडितके याच्यासह मालमोटार मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रवरा नदीपात्रातील उक्कलगाव येथील वाळूचा लिलाव झाला आहे. ठेकेदाराने नियमापेक्षा जास्त उपसा केला आहे. आता श्रीरामपूर तालुका हद्द सोडून राहुरी तालुका हद्दीत केसापूर हद्दीत ते घुसले आहेत. पण श्रीरामपूरचे तहसीलदार किशोर कदम यांच्याकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही, त्यामुळे केसापूरचे गावकरी वाळूउपसा बंद करण्यासाठी गेले असता काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आज सकाळी १० वाजता प्रवरा नदीपात्रात उक्कलगाव येथे मोठी धुमचक्री झाली. गावकऱ्यांना मारहाण करण्यात आली. राहुरी पोलीस ठाण्यात ही घटना कळवण्यात आली. त्यानंतर सुमारे २५ पोलीस कर्मचारी आले तेव्हा गुंडांनी नदीपात्रातून पोबारा केला. राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रवरा नदीपात्रात बोधेगाव (ता. राहुरी) येथे वाळूतस्करांनी अवैध वाळूउपसा करून शिरपूर पद्धतीचा बंधारा तयार केला. करजगाव येथील नागरिकांनी तलाठय़ाकडे तक्रारी केल्या असता वाळूउपसा करणारे काँग्रेसचे श्रीरामपूर तालुक्यातील कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे गावठी रिव्हॉल्व्हर आहेत. त्यामुळे आम्ही कारवाईला घाबरतो, असे सांगितले. आता या वाळूउपशाचा पंचनामा करून कारवाई करावी म्हणून करजगावचे गावकरी आंदोलन करणार आहेत. कान्हेगाव येथे लाख बंधाऱ्यातून वाळू उपसा केला जातो. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली नाही.