देशाच्या मुळावर उठलेल्यांशी साटेलोटे करण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट करीत औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी शिवसेना आणि एमआयएम यांच्यामध्ये कोणतेही संबंध नसल्याचे सांगितले. त्याचवेळी वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीवेळी राणे यांनी ओवेसी बंधुंना प्रत्येकी पाच कोटी देण्याची ऑफर दिली होती, असा आरोपही त्यांनी केला. औरंगाबादमध्ये ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राणे यांच्या मुलांवरही जोरदार टीका केली.
ते म्हणाले, एमआयएम आमचा नंबर एकचा शत्रू आहे. त्यांच्याशी साटेलोटे करण्याचा प्रश्नच येत नाही. औरंगाबादचा पालकमंत्री म्हणून तेथील अनेक नेते वेगवेगळी कामे घेऊन मला भेटायला येतात. त्याचप्रमाणे तेथील एमआयएमचे आमदारही मला भेटायला आले होते. त्यावेळी माझ्यासोबत आमचे दहा-पंधरा आमदार उपस्थित होते. याचा अर्थ साटेलोटे असा होत नाही. देशाच्या मुळावर उठलेल्यांसोबत साटेलोटे करण्याचा प्रश्नच येत नाही.
नारायण राणे यांच्या मुलांना गल्लीतही कोणी किंमत देत नाही, अशी टीका करून ते म्हणाले, मुंबईतील ताज हॉटेलमध्ये राणे यांनी एमआयएमच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती मला मिळाली होती. त्यावेळी राणेंनी ओवेसी बंधुंना प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्याचे आमीष दाखवले होते. त्याचबरोबर पक्षासाठीही निधी देण्याचे आश्वासन दिले होते, असा आरोप त्यांनी केला.
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केल्यानंतर दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नारायण राणे यांचे पुत्र नीतेश राणे यांनी शिवसेना आणि एमआयएम यांच्यामध्ये साटेलोटे असल्याचा आरोप केला होता. त्याला रामदास कदम यांनी उत्तर दिले.