जिल्ह्य़ातील विधानसभेच्या पाचपकी तीन जागा, रावसाहेब दानवे यांच्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद, बबनराव लोणीकर यांच्यामुळे कॅबिनेट मंत्रिपद असतानाही भाजपच्या जालना जिल्हा परिषदेतील जागा गेल्या वेळच्या तुलनेत वाढून २२ झाल्या असल्या तरी अध्यक्षपदासाठी निर्विवाद बहुमत मात्र मिळू शकले नाही. गेली २० वष्रे जिल्हा परिषदेत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला या वेळेस १४ जागा मिळाल्या आहेत. या वेळेसही या दोन्ही पक्षांच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या निर्विवाद बहुमतापेक्षा अधिक आहे. मावळत्या लोकनिर्वाचित जिल्हा परिषदेत अध्यक्षपद भाजपकडेच होते.

या वेळेस खासदार दानवे यांचा प्रभाव असलेल्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील एकूण १६ पकी १० जागा भाजपने जिंकल्या आहेत. मंत्री लोणीकर यांच्या प्रभाव क्षेत्रातील परतूर आणि मंठा तालुक्यांतील १० पकी ६ जागा भाजपने जिंकल्या आहेत. या दोन्ही नेत्यांचा प्रभाव आपल्या भागात राहिला आहे; परंतु भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या विधानसभा मतदारसंघातील बदनापूर तालुक्यामधील पाचपकी चार जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. खासदार दानवे यांच्या कन्या आशाताई पांडे, मंत्री लोणीकर यांचे पुत्र राहुल यांचा भाजपच्या प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. शिवसेनेच्या प्रभावाखाली मानल्या जाणाऱ्या जालना तालुक्यात भाजपच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. जिल्हय़ातील चार पंचायत समित्यांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे.

गेल्या वेळेस १५ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेस या वेळेस जिल्हा परिषदेच्या १४ जागांवर विजय मिळाला आहे. जिल्हय़ात निवडून आलेले दोन अपक्ष शिवसेनेशी जवळीक असणारे आहेत. भाजपचा प्रभाव असलेल्या भोकरदन तालुक्यात मात्र शिवसेनेने दोन जागा, तर बदनापूरमध्ये पाचपकी चार जिल्हा परिषदांच्या जागेवर विजय मिळवलेला आहे. शिवसेनेला मिळालेल्या १४ जागांपकी १० जागा घनसावंगी, जालना आणि बदनापूर तालुक्यांतील आहेत.

जालना तालुक्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे बंधू अनिरुद्ध यांचा विजय भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांच्या पराभवामुळे अधोरेखित झालेला आहे.

राष्ट्रवादीला १३ जागा

१३ जागांवर राष्ट्रवादीला यश मिळाले असले तरी बदनापूर आणि मंठा या दोन तालुक्यांत मात्र या पक्षास एकही जागा जिंकता आली नाही.  राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार राजेश टोपे यांनी त्यांच्या घनसावंगी तसेच अंबड तालुक्यातील आपला प्रभाव कायम ठेवला असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले. या दोन्ही तालुक्यांत राष्ट्रवादीला एकूण १६ पकी ८ जागांवर विजय मिळाला असून दोन्ही पंचायत समित्यांमध्ये बहुमत मिळालेले आहे. तीन वेळेस राष्ट्रवादीकडून आमदार राहिलेले चंद्रकांत दानवे यांना त्यांच्या भोकरदन तालुक्यात मात्र फारसा प्रभाव दाखविता आला नाही.

काँग्रेसची पीछेहाट

या वेळेसही मागील तीन निवडणुकांप्रमाणे काँग्रेसची पीछेहाट कायम राहिलेली आहे. काँग्रेसला २००२ मध्ये ५, २००७ मध्ये चार आणि २०१२ मध्येही जिल्हा परिषदेच्या चारच जागांवर विजय मिळाला होता. या वेळेसही या पक्षाला पाचच जागा जिंकता आल्या आहेत. यापकी दोन जागा जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांच्या परतूर आणि मंठा तालुक्यांतील आहेत, तर तीन जागा माजी आमदार कैलास गोरंटय़ाल यांचे कार्यक्षेत्र असलेल्या जालना तालुक्यातील आहेत.

सत्तेसाठी पर्याय खुले?

भाजप २२, शिवसेना १४ आणि राष्ट्रवादी १३ याप्रमाणे जागा जिंकणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. मंत्री बबनराव लोणीकर यांना अध्यक्षपद भाजपकडेच येणार याबद्दल विश्वास आहे. या पक्षाकडून अध्यक्षपदासाठी लोणीकर यांचे पुत्र राहुल आणि खासदार दानवे यांच्या कन्या आशाताई पांडे यांचे नाव चच्रेत आहे. जिल्हा परिषदेत कोणासोबत जायचे, याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पातळीवरच होईल, असे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादीला सर्व पर्याय खुले असले तरी या संदर्भातील अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या संमतीनुसारच घेतला जाईल, असे या पक्षाचे जिल्हय़ातील नेते आमदार राजेश टोपे यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी सांगितले की, जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने आपण लवकरच प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहोत.