भाजप-काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप

नांदेड महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. काँग्रेस व भाजपकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात असून त्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी घेतलेल्या सभेत नांदेडचा समावेश स्मार्ट सिटीत न होण्यामागे काँग्रेसचा येथील २० वर्षांचा कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप केला. शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या सभेत भाजपकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. केंद्रातील मोदी व राज्यातील देवेंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे विश्वासार्हता गमावली आहे, अशी टीका खासदार चव्हाण यांनी केली. भाजपच्या सभेत बोलताना खासदार दानवे यांनी नांदेडच्या मतदारांनी परिवर्तनाची कास धरत मनपाची सत्ता भाजपच्या हाती दिल्यास नांदेड शहराचा संपूर्ण कायापालट करू, अशी ग्वाही दिली. नांदेड-वाघाळा मनपा निवडणुकीच्या निमित्ताने खा.दानवे नांदेड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीतील प्रमुख नेत्यांच्या बठकीतील एकंदर स्थितीचा आधी आढावा घेतला. शुक्रवारी सकाळच्या सत्रात पक्षाच्या मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन दानवे यांनी केले. सायंकाळी त्यांची जाहीर सभा पार पडली.   राज्यमंत्री दिलीप कांबळे, रणजित पाटील, राजकुमार बडोले आदी मंत्र्यांनी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये सभा घेतल्या.

उद्धव ठाकरे यांची आज सभा

नांदेड-वाघाळा मनपा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी नांदेडमध्ये येत असून सायंकाळी ६ वाजता मल्टिपर्पज हायस्कूलच्या प्रांगणावर त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती पक्षाचे स्थानिक आमदार हेमंत पाटील यांनी दिली. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पक्षाचे अनेक माजी नगरसेवक भाजपत गेले तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी २० प्रभागांतील बहुसंख्य जागांवर पक्षाचे उमेदवार दिले आहेत. सत्तेतील दोन प्रमुख पक्ष नांदेडमध्ये एकमेकांविरुद्ध लढत आहेत. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम, पालकमंत्री अर्जुन खोतकर, आमदार नीलमताई गोऱ्हे, खासदार चंद्रकांत खैरे आदी नेते येथे तळ ठोकून आहेत.

भाजपकडे लोकनेतृत्व नाही

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार चव्हाण यांनी, कोणत्याही शहराला लोकमान्य नेतृत्व हवे असते. नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षात तसे नेतृत्व नाही, अशी टीका केली. काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचा खासदार या नात्याने शहराच्या विकासाची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे, असेही ते म्हणाले. प्रभाग ४ मध्ये शनिवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, मुंबईचे माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वसंतराव चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बी. आर. कदम, नामदेवराव केशवे, दिलीप पाटील बेटमोगरेकर आदींची उपस्थिती होती. केंद्रातील नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या गेल्या तीन-साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत कुठल्याही वर्गाचे भले झालेले नाही. शेतकरी, मुस्लिम, मागासवर्गीय, आदिवासी आदी घटक त्रस्त झाले आहेत. खा.गायकवाड यांनी राज्यातील भावी सत्ता परिवर्तनाची सुरुवात नांदेडपासून करण्याचे आवाहन मतदारांना केले.