शिवसेनेकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आल्यानंतर आता भाजपकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मित्रपक्षांनी स्वत:ची ताकद पाहून जागा मागितल्या पाहिजेत. भविष्यात शक्य झाले तरच युती करू, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सेनेला एकप्रकारे प्रतिआव्हान दिले आहे. शिवसेनेकडून स्वबळाचा नारा देण्यात आल्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी युतीसंदर्भात भाजपची भूमिका अनुकूल असल्याचे म्हटले होते. मात्र, रावसाहेब दानवे यांनी शक्य झाल्यास युती करू, असे विधान करून या भूमिकेला छेद दिला आहे. दानवे यांनी शुक्रवारी पुण्यात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाच्यावेळीही अशाचप्रकारची भाषा केली होती. शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा करण्यासाठी आमची तयारी आहे. युती झाली तर ठीकच अन्यथा आम्ही एकट्याने लढू असे स्पष्ट करत जिल्हास्तरावरील नेत्यांनी युतीसाठी चर्चा करावी असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले होते.
दरम्यान, शनिवारी गोव्याच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली. भाजप म्हणजे सत्तांध पक्ष आहे. सत्ता आली म्हणून त्यांना काही दिसेनासे झाले आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी शिवसेना विरोधी पक्षासारखे काम करत आहे. खुर्ची ही सत्ता राबविण्यासाठी असते, उबविण्यासाठी नव्हे, असे उद्धव यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतला होता. ताकद दाखविण्यासाठी आणि भाजपकडून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीचा वचपा काढण्यासाठी या निवडणुका स्वबळावर लढविण्याकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कल असल्याचे समजते. युतीचा निर्णय शिवसेना स्थानिक पातळीवर घेणार नसून ठाकरे हेच घेणार आहेत. स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा, अशा सूचनाच ठाकरे यांनी गुरुवारी शिवसैनिकांना दिल्या होत्या. सत्तेत आल्यापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या कुरबुरी गेल्या दोन-अडीच वर्षांत विकोपाला पोहचल्या आहेत. त्यामुळे विधानसभेप्रमाणेच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर दोन्ही पक्ष विभक्त होतील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपला हिंमत असेल तर युती तोडून दाखवा, असे आव्हानही दिले होते.